तेलंगणात मुस्लिमांना १२ टक्के आरक्षण, मुख्यमंत्र्यांची घोषणा
आता मुस्लिमांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण प्रवेशामध्ये आरक्षण देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेय. त्यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय.
अमरावती : तेलंगणामध्ये मुस्लिमांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण प्रवेशामध्ये १२ टक्के आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.
केंद्र सरकारने याबाबतच्या विधेयकाला मान्यता दिली नाही तर वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विधानसभेत मुस्लिमांना १२ टक्के आरक्षण देण्याचा विधेयक मंजूर करण्याता आलेय.
अनुसूचित जाती आणि जमातींना देण्यात येणाऱ्या विविध सरकारी सवलती मुस्लिमांना देखील दिल्या जातील, असेही त्यांनी विधानसभेत बोलताना सांगितले. ऊर्दूला दुसऱ्या क्रमांकाच्या भाषेचा दर्जा देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
सध्या, मुस्लिमांसाठी आरक्षण ४ टक्के आहे, तर अनुसूचित जमातींसाठी ६ टक्के आहे. या आरक्षणात वाढ करण्यात आली असून अनुक्रमे १२ आणि १० टक्के करण्यात आले आहे.
सत्तारूढ टीआरएस आणि एमआयएम यांनी ऐतिहासिक विधेयक म्हणून मान्यता दिली, त्यास काँग्रेस आणि सीपीआय (मार्क्सवादी) कडून पाठिंबा मिळाला होता. त्याचप्रमाणे भाजपने विधेयकाला विरोध केला होता. भाजपने म्हटले होते की, धर्मावर आरक्षण घटनात्मक नियमांविरुद्ध होते. भाजपने विधासभा सभागृहात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाच जणांना सभागृहातून निलंबित करण्यात आले होते.