मुंबई : भारतीय रेल्वेने 1 जूनपासून 230 प्रवासी गाड्या चालवण्याची घोषणा केली असून त्यासाठी तिकिटांचे बुकिंग गुरुवारी सुरू झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या 24 तासात या 230 गाड्यांसाठी 13 लाखाहून अधिक तिकिटे बुक केली गेली आहेत. रेल्वेने २१ मे रोजी म्हणजेच गुरुवारी सर्व 230 प्रवासी गाड्यांसाठी सर्व श्रेणींमध्ये बुकिंग सुरु केली आहे. तसेच, काऊंटरवरूनही रेल्वेने तिकिट बुकिंगची सुविधा सुरू केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी रेल्वेने सांगितले की, "देशातील वेगवेगळ्या स्थानकांना जोडणार्‍या 230 प्रवासी गाड्यांमध्ये सर्व प्रकारच्या श्रेणीसाठी रेल्वे तिकिटांचे बुकिंग सुरू केले आहे. आरक्षित तिकिटे ऑनलाईन बुकिंग व रेल्वे आरक्षण काउंटरद्वारे बुक करता येतील. कालपासून 13 लाखाहून अधिक प्रवाशांनी तिकिटे बुक केली आहेत. यापूर्वी गुरुवारी तिकिटांचे बुकिंग सुरू होताच पहिल्या तासामध्ये दीड लाख तिकिटे बुक करण्यात आली. त्याचबरोबर पहिल्या अडीच तासात 4 लाख तिकिटे बुक करण्यात आली.


या 230 गाड्यांसाठी रेल्वेने तिकिट काउंटर देखील उघडले आहेत. त्याशिवाय आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे प्रवासी ऑनलाईन तिकीट बुक करू शकतात. एवढेच नाही तर पोस्ट ऑफिस, पॅसेंजर तिकीट सुविधा केंद्र (वायटीएसके), पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (पीआरएस) आणि कॉमन सर्व्हिस सेंटरमधूनही तिकिटे बुक करता येतील.


1 जूनपासून रेल्वेने दररोज 230 गाड्या चालवण्याचा निर्णय घेतल्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी रेल्वे मंत्रालयाने याची घोषणा केली. या गाड्यांमध्ये एसी, स्लीपर आणि जनरल कोच असतील. या गाड्या दररोज धावतील.


या गाड्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी चालविण्यात येणाऱ्या लेबर स्पेशल ट्रेन आणि दिल्ली ते इतर शहरांमध्ये धावणा-या एसी विशेष गाड्यां व्यतिरिक्त असणार आहेत. यापूर्वी रेल्वेने 30 जूनपर्यंत सर्व नियमित प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत.


रेल्वेने सांगितले की, 'या 230 गाड्या चालविल्यामुळे जे प्रवासी काही कारणास्तव विशेष गाड्यांची सुविधा घेण्यास असमर्थ आहेत त्यांनाही मदत होईल. रेल्वेने असे सांगितले की ते (प्रवासी) जवळच्या रेल्वे स्थानकातून रेल्वे पकडू शकतील असा प्रयत्न केला जाईल.'