भारतीय सेनेला `मोदी सेना` म्हणणं भाजपच्या अंगाशी, माजी सैनिकांनी व्यक्त केली नाराजी
माजी लष्कर प्रमुख, माजी नौदल प्रमुखांसहीत १५६ जणांचं राष्ट्रपतींना पत्र
नवी दिल्ली : भारतीय सैन्यानं केलेल्या लष्करी कारवायांचा राजकीय वापर होत असल्यानं माजी सैनिक भडकले आहेत. यासंदर्भात त्यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे धाव घेतली असून त्यांना एक पत्रही लिहिलंय. या पत्रात माजी लष्कर प्रमुख, माजी नौदल प्रमुखांनी सैन्याच्या कामगिरीचं श्रेय राजकीय पक्षांनी घेऊ नये, असे आदेश त्यांना देण्यात यावेत, अशी विनंती केलीय. राष्ट्रपतींना पत्र लिहिणाऱ्या १५६ माजी सैनिकांमध्ये माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांच्यासह देशाच्या तिन्ही दलांच्या ८ माजी प्रमुखांच्या सह्या आहे. अभिनंदन वर्धमान यांचं छायाचित्र काहींनी फलकावर लावलं होतं. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय सैन्याचा उल्लेख 'मोदी सेना' असा केला होता.
भारतीय सेनेचा उल्लेख 'मोदी की सेना' असा करणं भाजपला भलतंच महागात पडणार असं दिसतंय. लोकसभा निवडणूक २०१९ साठी देशभर प्रचार आणि मतदान सुरू असतानाच माजी सैनिकांनी एकत्र येत लोकसभा निडवणुकीच्या प्रचारात सेनेचं नाव 'वापरलं' जात असल्याचा आरोप घेत या प्रकाराला आक्षेप घेतलाय. आक्षेप घेणाऱ्यांत माजी लष्कर प्रमुख आणि माजी नौदल प्रमुखांचाही समावेश आहे. या संदर्भात नाराज माजी सैनिकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि निवडणूक आयोगाला एक पत्रही धाडलंय.
तब्बल १५६ माजी सैनिकांनी एकत्र येत या पत्राद्वारे आपली नाराजी उघड केलीय. नेत्यांकडून लष्कराच्या शौर्याचा राजकीय वापर होत असल्याची तक्रार त्यांनी याद्वारे केलीय. सोबतच सैनिकांचे फोटो लावून राजकीय प्रचारालाही आक्षेप या पत्रात घेण्यात आलाय. यामध्ये सीमेपलिकडील कारवाईचं क्रेडीट राजकारण्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी घेण्याचा प्रयत्न करू नये, असं म्हटलं गेलंय.
काँग्रेसवर टीका करताना 'काँग्रेसचे लोक दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालत होते आणि 'मोदींची सेना' आज दहशतवाद्यांना गोळ्या घालत आहेत' असं वादग्रस्त वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी गाझियाबाद इथल्या जाहीर सभेत केलं होतं. यावर स्पष्टीकरण देताना 'योगी आदित्यनाथ यांनी बोलताना चुकून 'मोदींची सेना' हा शब्द उच्चारला असेल. मात्र, त्यावरून इतकं राजकारण व्हायला नको होतं' असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सारवासारवीचा प्रयत्न केला होता. तर निवडणूक आयोगानं योगींच्या वक्तव्याची दखल घेत त्यांना भारतीय लष्कराबाबत सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला होता.
तसंच पंतप्रधान मोदींनी लातूरच्या औसामधल्या सभेत नवमतदारांना पुलवामातल्या शहिदांची, हवाई हल्ला करणाऱ्या जवानांची आठवण ठेवत त्यांच्यासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. सैनिकांसाठी आणि शहीदांना मत देताना ते कमळाच्या बटण दाबून द्यावे म्हणजे तुमचे मत मोदींना जाईन, असे उघडपणे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे तक्रारही देण्यात आली आहे.