...आणि १६ वर्षांची मुलगी बनली पोलीस अधिकारी!
पोलीस अधिकारी बनण्याची संधी मिळाल्याचा आनंद या चिमुरडीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता
गुजरात : प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी ध्येय असतं... आपलं संपूर्ण आयुष्यात त्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी अनेक जण शेवटपर्यंत प्रयत्न करतात. जेव्हा हे प्रयत्न यशस्वी ठरतात तेव्हा होणारा आनंद हा अवर्णनीय असतो... असाच आनंद झालाय १६ वर्षांच्या एका मुलीला, कारण तिचं स्वप्न सत्यात उतरलंय. गुजरातच्या राजकोटमध्ये राहणारी ही १६ वर्षीय मुलगी एचआयव्ही ग्रस्त आहे. पोलीस अधिकारी बनण्याचं तिचं स्वप्न होतं. तिचं हे स्वप्न एका दिवसासाठी का होईना पण पूर्ण झालंय. राजकोट महिला पोलीस स्टेशनमध्ये ही मुलगी पोलीस अधिकारी बनून दाखल झाली. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनीही तिला सॅल्युट करून तिचं स्वागत केलं.
राजकोटमध्ये २००३ पासून कार्यरत असणाऱ्या आणि एचआयव्ही ग्रस्तांसाठी कार्य करणाऱ्या 'डिस्ट्रीक्ट नेटवर्क ऑप पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही' या संस्थेनं २५ चिमुरड्यांची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला होता. यामध्ये, काही मुलांनी मोबाईल, सायकल किंवा अशा इतर वस्तूंची मागणी केली होती. परंतु, एका मुलीनं मात्र आपल्याला पोलीस बनण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं.
तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी संस्थेनं राजकोट पोलीस आयुक्तांची भेट घेऊ त्यांच्या कानावर ही गोष्ट पोहचवली. पोलिसांनीही तिची ही इच्छा पूर्ण करताना या १६ वर्षीय मुलीला एका दिवसासाठी पोलीस इन्स्पेक्टरांच्या खुर्चीवर बसण्याची संधी दिली.
संबंधित १६ वर्षांची मुलगी ही जन्मापासूनच एचआयव्ही पॉझिटीव्ह आहे. परंतु, ती आत्तापर्यंत आपलं आयुष्य खूपच सकारात्मकरित्या जगली. पोलीस अधिकारी बनण्याची संधी मिळाल्याचा आनंद या चिमुरडीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. तिला आनंदी पाहून पोलिसांनाही भरून पावलं.