गुहाहटी : मुसळधार पावसाने आसाम, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यांना चांगलेच झोडपून काढले आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे आसाम आणि बिहारला पुराचा मोठा फटका बसला आहे. या राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे आलेल्या पुरात आतापर्यत १७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आसाम बिहार आणि उत्तरप्रदेशसोबत अनेक राज्यांना या पावसाचा फटका बसला आहे. सध्या बिहार या राज्यात मुळधार पाऊस पडत आहे.  येथे आतापर्यत १०४ लोकांचे बळी गेले आहेत. ७६ लाख ८५ हजाराहून आधिक लोकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडू, कर्नाटक, झारखंड, केरळ या राज्यांत येत्या काही दिवसांत अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागने दिला आहे. आसाममध्ये २९ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे ५७,५१,९३८ लोकांना या पुराचा फटका बसला आहे. आसाम या राज्यात महापुरामुळे जवळपास ४३० चौ.किमी. क्षेत्रफळ आणि काझीरंगा या अभयरण्यातील ९० टक्के भागमध्ये पाणी शिरले आहे. 


काझीरंगा हे अभयरण्य गेंडासाठी प्रसिध्द आहे. जलप्रलयापासून बचावण्यासाठी अनेक प्राणी उंच जागी जाण्याची धडपड करीत आहेत, मात्र आतापर्यत २३ प्राण्यांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. चिरंग, बारपेट आणि बक्सा या जिल्ह्यातील अनेकांच्या जमिनी नापिक झाल्या आहेत. ४,६२६ या इतकी गावे पाण्याखाली गेली आहे. या पुरामध्ये आतापर्यत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे.  



आसामला पुरग्रस्त म्हणून घोषीत केले आहे. आसाममधील पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा, अशी काँग्रेस खासदारांची मागणी आहे. यापूर्वी देखील आसाम या राज्यात पावसाने हाहकार केला होता मात्र यावेळी फार जास्त नुकसान झाले आहे.  आसाममधील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात २९ जिल्ह्यांना पुराने वेढले आहे. पुरग्रस्त जिल्ह्यांमध्ये चिरंग, लखीमपूर, सोनीतपूर, दारंग, बारपेट, नालबारी,  बोंगाईगाव, कोक्राझार, गोलाघाट,गोलपाडा, मोरीगाव,बक्सा, होजई, मजुली, बिस्वनाथ, जोरहाट,तीनसुकिया, दिब्रुगढ,धेमजी, आणि शिवसागर, या जिल्ह्याचा समावेश आहे.
एनडीआरएफच्या पथकाने आतापर्यंत ८५० नागरिकांना पुरामधून बचाविले आहे. आसाम या राज्यातील पुराची स्थिती कळतांच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडून दूरध्वनीवरून पुराबद्दलच्या परिस्थिती माहिती घेऊन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व ती मदत करु, असे आश्वासन दिले आहे. या पुरात आसाममधील रस्ते पूल आणि बांधकाम वाहून गेले आहे. 



प्रशासनाने ११ जिल्ह्यांत ६८ मदत छावण्या उभारल्या आहे. त्यामध्ये हजारो लोकांनी आश्रय घेतला आहे. आसाममधील पूरपरिस्थिती गंभीर असल्याने अनेक सेलिब्रटी आणि खेडाळू या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत आहे आणि मदत देखील करत आहे.