तब्बल 176 कोटींच्या GST घोटाळ्यानं यंत्रणांना खडबडून जाग; देश सोडून पळणाऱ्या आरोपीला Filmy Style मध्ये रोखलं
Tax Fraud Mastermind Arrested : चेन्नई येथील 176 कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या मास्टरमाईंडला बेंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला अटक करण्यात आली आहे.
Tax Fraud : गरीब लोकांच्या नावावर शेल कंपन्या आणि बोगस पावत्या तयार करून सरकारचे 176 कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा (input tax credit racket) 34 वर्षीय कथित सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. सरकारचं मोठं नुकसान करणारा आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याला जीएसटी इंटेलिजेन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी (General of GST Intelligence) अटक केली. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला बंगळुरु विमातळावरुनच (Bengaluru airport) अटक केली आहे.
जीएसटी इंटेलिजेंस महासंचालनालयाच्या चेन्नई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी, चेन्नईमधल्या गरीब लोकांना बँकेकडून कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांचे आधार आणि पॅन तपशील गोळा केले आणि नंतर त्यांच्या नावे अनेक बनावट कंपन्या तयार केल्या. प्रकरणाची माहिती मिळताच चेपॉक येथील रहिवासी असलेल्या 34 वर्षीय मास्टरमाइंडला अधिकाऱ्यांनी बंगळुरु विमानतळावरून अटक केली. देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या साथीदाराला 22 जून रोजी पेरांबूर येथे अटक करण्यात आली होती.
जीएसटी इंटेलिजन्स युनिटच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी 175.88 कोटी रुपयांची बनावट बिले बनवली होती ज्यांचे करपात्र मूल्य 973.64 कोटी रुपये होते. अनेक कंपन्यांनी या आरोपीला कामे दिल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी अत्यंत सावधगिरीने लोकांची फसवणूक करत असे. तो रिमोट ऍक्सेस सॉफ्टवेअर, परदेशातील सिम कार्ड आणि तंत्रज्ञानाने युक्त अशा फोनची मदत घेत असे. इंटेलिजन्स युनिटने आरोपीला पकडण्यासाठी त्याचा आयपी अॅड्रेस ट्रॅक केला तसेच त्याचे व्हॉट्सअॅप चॅट्सचेही विश्लेषण केले होते. अनेक ठिकाणी त्याचा शोधही घेतला गेला होता, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
आरोपीकडून मोबाईल फोन, एक मॉडेम, एक लॅपटॉप आणि सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्याची 25 बँक खाती गोठवण्यात आली असून 20 जीएसटी नोंदण्या रद्द करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कथितपणे खोटी बिले तयार करण्यासाठी रिमोट-अॅक्सेस सॉफ्टवेअर, परदेशी सिम कार्ड, वापरत असे. आरोपी कमी उत्पन्न गटातील व्यक्तीच्या पॅन आणि आधार प्रमाणपत्राचा वापर कर्ज मिळवण्यासाठी करत होता. तसेच त्यांच्या नावावर शेल कंपन्या तयार करत होता.
यापूर्वी, 29 मे रोजी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका खाजगी कंपनीच्या मालकाला आणि अन्य एका व्यक्तीला जीएसटी अंतर्गत १२ कोटींहून अधिक रकमेची इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठी बनावट बिलांचा वापर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. अन्नधान्य खरेदी आणि विक्रीमध्ये असलेल्या या फर्मने कथितरित्या बनावट बिले सादर केली आणि 12 कोटींहून अधिक इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले होते. सहआरोपींनी गुजरातमधील ब्रोकरमार्फत कंपनी मालकाला बोगस कंपन्यांची बनावट बिले दिली होती.