मुंबई : राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून मतदानाआधी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मार्चच्या सुरुवातीला गुजरातच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता. यानंतर काँग्रेसच्या आमदारांची संख्या 68 झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, कर्जनचे आमदार अक्षय पटेल यांनी राजीनामा दिला असून आणि कपराडाचे आमदार जीतू चौधरी हे पक्षाच्या संपर्कात नसल्याचं बोललं जातंय. तर आणखी आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जातंय.


एका वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते म्हणाले की, दोन आमदारांच्या राजीनाम्याची मी पुष्टी करू शकतो. पण तिसर्‍या आमदाराच्या राजीनाम्याविषयी नाही सांगता येत नाही. पण आम्हाला ही अपेक्षा होती. हा गुजरात आहे. इतर राज्यांत या प्रकारचे काम करू शकतात तर  गुजरात हे तर त्यांचे घर आहे.


गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव म्हणाले की, भारत आपल्या स्वतंत्र इतिहासाच्या सर्वात मोठ्या आरोग्य, आर्थिक आणि मानवी संकटात आहे. असे असूनही, राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप आपली सर्व शक्ती आमदारांच्या घोडेबाजारावर लावत आहे. यामुळे गुजरातमधील जनतेचे नुकसान होऊ शकते.


याआधी मार्चमध्ये ही काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची संख्या 68 वर आली होती. पण आता काँग्रेसच्या आमदारांची संख्या 66 झाली आहे. अशा परिस्थितीत राज्यसभेच्या चार पैकी दोन जागा जिंकण्याचा काँग्रेसचा दावा चुकीचा ठरु शकतो.