दिनेश दुखंडे, पणजी : गोव्यामध्ये काँग्रेसला आणखी 2 धक्के बसण्याची शक्यता आहे. याआधी काँग्रेसचे एकूण 4 आमदार भाजपात प्रवेश करणार होते. त्यापैकी सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी गेल्या मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. आता उर्वरित दोन आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपात प्रवेश केलेल्या दयानंद सोपटेंना गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्षपद, तर सुभाष शिरोडकर यांना गोवा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात येणार आहे. तर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या 2 काँग्रेस आमदारांनाही महामंडळाचं अध्यक्ष पद देण्यात येणार आहे.


सरकारला पाठिंबा दिलेल्या घटक पक्षांच्या अटी आणि काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा या त्रासातून सुटका होण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींची ही खेळी असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे आणखी 2 आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये आल्यास विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ घटून 12 वर येतं. तर 40 आमदारांच्या विधानसभेत 36 आमदार राहतील. अशावेळी बहुमताचा आकडा हा 21 आमदारांऐवजी 19 आमदार असा राहिलं.


दरम्यान, काँग्रेस आमदार फोडण्याचे तीव्र पडसाद गोवा भाजपमध्ये अजूनही उमटत आहेत. कोअर कमिटीत सदस्य असलेल्या माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी आपली नाराजी व्यक्त करणं सुरूच ठेवलं आहे. विनय तेंडुलकर यांच्याकडे सध्या राज्यसभा खासदार आणि गोवा भाजपचे अध्यक्षपद अशा दोन जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे गोवा भाजपला पूर्णवेळ अध्यक्ष असावा अशी मागणी राजेंद्र आर्लेकर यांनी केली आहे.


लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मांद्रे विधानसभा मतदार संघात शुक्रवारी आयोजित केलेल्या पदाधिकारी-कार्यकर्ता बैठकीत प्रदेश नेत्यांप्रमाणेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही टीका केली होती. त्या भाषणाची सिडी पक्षाने मागवून घेतली आहे. पार्सेकर यांच्यावर पक्षशिस्त भंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.