India Was Close To Print 5000 to 10000 Rs Notes: केंद्र सरकारने 19 मे रोजी 2 हजारांच्या नोटा चलनामधून बाद (2000 Rs Note Ban) केल्या जाणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) माध्यमातून केली. 23 मे पासून बँकांमध्ये 2 हजारांच्या नोटा बदलून देण्यास सुरुवातही झाली आहे. मात्र या घोषणेनंतर पुन्हा एकदा  1 हजारांची नोट चलनात येणार का यासंदर्भातील चर्चा सुरु झाली आहे. मात्र सर्वोच्च मूल्य असलेली नोट चलनातून बाद होत असली तरी आरबीआयकडून नव्या कोणत्याही नोटांसंदर्भात काहीही घोषणा करण्यात आलेली नाही. या निर्णयानंतर भारतीय चलनासंदर्भातील चर्चा जोरात आहेत. अगदी भारतीय चलनाच्या इतिहासापासून ते नोटबंदीपर्यंतची चर्चा सुरु असताना रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी दिलेला एक जुना सल्लाही सध्या चर्चेत आहे. 


...म्हणून दिलेला 5 अन् 10 हजारांची नोट छापण्याचा सल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतामध्ये 5 हजार रुपये आणि 10 हजार रुपयांच्या नोटा छापण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला. मात्र केंद्रातील सरकारने हा प्रस्ताव फेटाळला होता. अर्थात 2016 च्या नोटबंदीच्या निर्णयानंतर चलन तुटवडा भरुन काढण्यासाठी 2 हजारांच्या नोटा छापण्यात आल्या. मात्र आता 7 वर्षानंतर या नोटा चलनातून हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. बनावट चलनाविरुद्धच्या धोरणाचा एक भाग असल्याचं सरकारकडून सांगितलं जातं आहे. मात्र 2 हजारांची नोट छापण्यापूर्वी नोटबंदीच्या काळात चक्क 10 हजारांची नोट छापण्यासंदर्भातही सल्लामसलत झाली होती. तसा हा 5 हजार आणि 10 हजारांच्या नोटा छापण्याचा सल्ला नोटबंदीच्याही 2 वर्ष आधी आरबीआयचे माजी गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांनी दिला होता. 1 हजार रुपयाच्या नोटेचं मूल्य ज्या प्रमाणात महागाई वाढत होती त्या तुलनेत फारच कमी झाल्याने अधिक मूल्याचं चलन छापण्याचा सल्ला राजन यांनी दिली होता. इकनॉमिक टाइम्समधील एका वृत्तानुसार, अधिक चलनाच्या नोटा छापल्याने महागाईसंदर्भातील परिस्थिती सुधरण्यास मदत होईल असं राजन यांचं म्हणणं होतं. मात्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळला.


तत्कालीन अर्थमंत्री काय म्हणालेले?


पब्लिक अकाऊंट कमिटीला देण्यात आलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेपर्यंत हा प्रस्ताव 2014 साली आला होता. मात्र बरीच चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. यानंतर जवळजवळ दीड ते 2 वर्षांनी सरकारने आरबीआयला 2 हजारांच्या नोटा छापण्यासंदर्भातील निर्णय कळवला.  तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 5 हजार आणि 10 हजारांच्या नोटा छापण्याचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोठ्या प्रमाणात फसवणूक होईल या भितीने एवढ्या मोठ्या मूल्याचं चलन छापण्यात आलं नाही. आपण फार अधिक मूल्य असलेल्या नोटा छापून चलनात आणल्या तर त्यामधून अधिक जास्त प्रमाणात फसवणुकीचे प्रकार घडतील असं रघुराम राजन यांनी सप्टेंबर 2015 मध्ये एका मुलाखतीत म्हटलं होतं.