भोपाळ : मध्य प्रदेशात सध्या त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ११५ जागांची गरज आहे. पण सध्या काँग्रेसकडे १०८ तर भाजपाकडे १०९ जागा दिसून येत आहेत. अर्थातच भाजप आणि काँग्रेसला इतर पक्षातील आमदारांची किंवा अपक्ष आमदारांची गरज पडणार आहे. यात प्रामुख्याने इतर जागांमध्ये बसपाच्या जागा सध्या ४ आहेत. तर इतर-अपक्ष ५ आहेत. यामुळे बसपा हा सध्या मध्य प्रदेशात किंग मेकरच्या भूमिकेत असल्याचं चित्र आहे. बसपा भाजपाच्या बाजूने जाण्याची शक्यता फार कमी आहे, तुलनेने काँग्रेसला बसपा पाठिंबा देईल का? हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण भाजपाच्या जर जागा आणखी वाढल्या तर इतरांच्या पाठिंब्याने भाजपा देखील मध्यप्रदेशात बहुमताच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात खऱ्या अर्थानं 'काँटे की टक्कर' सुरू आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाच्या आमदारांना देखील यामुळे महत्व येणार आहे. भाजपा यावर काय भूमिका घेणार आहे हे महत्वाचं ठरणार आहे.


राजस्थानात काँग्रेसचं सरकार येईल असा कल निवडणुकीआधी दिसत होता, पण मध्य प्रदेश, छत्तीसगडात हा अंदाज कुणालाही बांधता आला नाही. काँग्रेसचा मध्य प्रदेशात जोर कमी पडलाय, तर मध्य प्रदेशात भाजपाचा अति आत्मविश्वास, भाजपासाठीच डोकेदुखी ठरत आहे. भाजपाला आगामी लोकसभा निव़डणुका डोळ्यासमोर ठेवून विजय मिळवणं आवश्यक आहे.