2024 निवडणुकीत संपूर्ण देशात `खेला` होणार! ममता बॅनर्जी यांचा एल्गार
आतापर्यंत अच्छे दिनची खूप वाट पाहिली पण आता आम्हाला सच्चे दिन पाहायचे आहेत, असा टोला मोदी सरकारला लगावला आहे
नवी दिल्ली : दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'संपूर्ण देशात खेला होबे होणार, आणि 2024 ची निवडणूक मोदी विरुद्द संपूर्ण देश अशी होईल' असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
विरोधी पक्षाचं नेतृत्व करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी म्हटलं, मी राजकीय ज्योतिषी नाही, हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, आणखी कोणी नेतृत्व करणार असेल तर त्यात कोणतीही अडचण नाही' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. संसद अधिवेशनानंतर सर्व विरोधी पक्षांनी एकमेकांना भेटलं पाहिजे. विरोधी पक्ष मजबूत असेल तर इतिहास घडविला जाईल, असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.
सर्व विरोधी नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत आणि येत्या काळात एखादं राजकीय वादळ निर्माण झालं तर त्याला कोणीच रोखू शकणार नाही. विरोधी पक्षांनी यावर गांभीर्याने काम केल्यास सहा महिन्यांत त्याचे परिणाम दिसून येतील असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत अच्छे दिनची खूप वाट पाहिली पण आता आम्हाला सच्चे दिन पाहायचे आहेत, असा टोला ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला लगावला.
पेगासस प्रकरणावरही ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. हेरगिरीचा मुद्दा आपत्कालीन परिस्थितीपेक्षा गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की 'माझा फोन आधीच टॅप झाला आहे, जर मी माझा पुतण्या अभिषेक मुखर्जींशी बोलत असेन तर माझा फोनही आपोआप टॅप होतो.
पेगाससने प्रत्येकाचे जीवन धोक्यात आणलं आहे. ममता बॅनर्जी यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत सर्वपक्षीय बैठकीची मागणीही केली होती.