२०वा कारगिल विजय दिवस : राष्ट्रपतींचा द्रास दौरा रद्द
या शहिदांना पंतप्रधान, तिन्ही दलाचे प्रमुख, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली.
नवी दिल्ली : कारगिल युद्धातील भीमपराक्रमाला आज २० वर्ष पूर्ण झाली आहेत. अत्यंत कठीण परिस्थिती शत्रूला नामोहरम करण्यासाठी प्राणांची बाजी लावून भारतीय सैनिकांनी आपली मायभूमी सुरक्षित ठेवली. पण या कारवाईत पाचशेहून अधिक भारतीय जवान शहीद झाले. या शहिदांना पंतप्रधान, तिन्ही दलाचे प्रमुख, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली. तिन्ही दलाच्या प्रमुखांनी काश्मीरमधील द्रास येथे श्रद्धांजली वाहिली. खराब हवामानामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा द्रास येथील दौरा रद्द करण्यात आला.
पंतप्रधान ट्वीट करुन शहिदांना श्रद्धांजली दिली. कारगील विजय दिनी भारतमातेच्या वीर पुत्रांना मी मनापासून वंदन करतो.
हा दिवस आम्हाला सैनिकांचे साहस, शौर्य आणि समर्पणाची आठवण करुन देतो. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्णण करणाऱ्या पराक्रमी योद्ध्यांना विनम्र श्रद्धांजली. जय हिंद.
राष्ट्रपती रामदास कोविंद यांनी श्रीनगर येथील बदामी बागेतच शहिदांना आदरांजली अर्पण केली. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील वॉर मेमोरियल येथे भेट देऊन कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. अमर जवान ज्योत इथे संरक्षणमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण केले.