`त्या २३.२ लाख खात्यांची चौकशी सुरू`
नोटबंदीनंतर देशातल्या तब्बल २३.२२ लाख बँक खात्यांची चौकशी सुरु असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.
मुंबई : नोटबंदीनंतर देशातल्या तब्बल २३.२२ लाख बँक खात्यांची चौकशी सुरु असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. या बँक खात्यांमध्ये ३.६८ लाख कोटी रुपये संशयास्पदरित्या जमा झाले आहेत, असं गडकरी म्हणाले आहेत. जवळपास १७.७३ लाख व्यवहारांची ओळख पटली आहे. हे व्यवहार आयकराशी मिळत नसल्याची प्रतिक्रिया नितीन गडकरींनी दिली.
नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गडकरींनी हे वक्तव्य केलंय. नोटबंदीनंतर नंबर एक (सफेद) आणि नंबर दोन(काळी) अर्थव्यवस्था संपली असून आता आम्ही डिजीटल आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत, असा दावा गडकरींनी केलाय.
आता भाज्या आणि अन्यधान्य विकत घेताना डिजीटल व्यवहार होतोय. टोल प्लाझाही कॅशलेस होत आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे. डिजीटल व्यवहार ५८ टक्क्यांनी वाढलाय. तसंच दहशतवादी आणि माओवादी हल्ल्यांच्या घटनांना लगाम लागला आहे. नोटबंदीनंतर काश्मीरमध्ये होणारी दगडफेकही कमी झाली आहे. हवाला व्यापार संपला आहे. नोटबंदीचे असे अनेक फायदे गडकरींनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
नोटबंदीनंतर शेल कंपन्या पकडण्यात आल्या असून त्या बंद करण्यात आल्यात. तसंच हवाला आणि काळ्या पैशाची देवाणघेवाण करणाऱ्यांनाही पकडण्यात आलंय. या सगळ्यांची चौकशी सुरु आहे, असं गडकरी म्हणाले.