देवभूमीत दहशत; धडकी भरवणारा रहस्यमयी आवाज, मागोमाग धरणीकंप... विचित्र घटनांनंतर अख्खं गाव रिकामं
Kerala News : केरळात रातोरात गावातील शेकडो नागरिकांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला... निनावी सावटानं सारेच चिंतेत.
Kerala News : आधी भूस्खलन, नंतर फटाक्यांमुळं लागलेली आग, अधूमधून येणारी नैसर्गिक आपत्ती आणि त्यातच आता भर पडलीये ती म्हणजे एका अशा निनावी संकटाची, ज्यामुळं केरळातील एक अख्खं गाव रातोरात रिकामं झालं. दक्षिणेकडील देवभूमी अशी ओळख असणाऱ्या केरळातील अनक्कल्लू इथं मंगळवारी रात्री अचानकच विचित्र प्रसंग घडला. स्फोटाचा एक मोठा आवाज झाला, धरणीकंप जाणवू लागले आणि धरणीच्या उदरात काहीतरी मोठ्या हालचाली सुरु असल्याचा धडकी भरवणारा भास होऊ लागला.
घटनांची ही साखळी इतकी विचित्र होती, की आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचं चित्र पाहायला मिळालं. जवळपास 280 हून अधिक नागरिकांनी यानंतर गावातून पळ काढण्यास सुरुवात केली. वृत्तसंस्थांनी पोलिसांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार स्फोटासारखे आवाज होताच स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. ज्यानंतर सावधगिरी बाळगत साऱ्यांनीच गावातील शाळेचा आसरा घेतला.
पोलिसांच्या माहितीनुसार या गावातील जवळपास 85 गावातील नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्यात आलं. मंगळवारी रात्री 9.15 मिनिटांनी एक आवाज ऐकू आला आणि यानंतर 10.15 आणि 10.25 वाजतासुद्धा हा आवाज ऐकायला मिळाला. साधारण एक ते दोन किमी अंतरापर्यंत हा आवाज ऐकायला मिळाला ज्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड भीती पाहायला मिळाली.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक प्रतिनिधींनीसुद्धा घटनास्थळी धाव घेतली होती. इथं झालेले स्फोट आणि त्यानंतर जाणवलेले धरणीकंप यामागचं मूळ कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण, सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत यासंदर्भातील तपास यंत्रणांनी हाती घेतला असून, त्यामागचं मूळ कारण आता लवकरच समोर येणार आहे.
हेसुद्धा वाचा : मंदिरात आतषबाजीदरम्यान मोठी दुर्घटना; 150 हून अधिक लोक जखमी तर 8 व्यक्तींची प्रकृती चिंताजनक
केरळात फटाक्यांमुळं लागली होती भीषण आग...
इथं या घटनेची चर्चा सुरू असतानाच तिथं केरळात आतषबाजीमुळं घडलेल्या दुर्घटनेनंही अनेकांच्या मनात धडकी भरवली होती. देवभूतील नीलेश्वरमजवळील एका मंदिरात उत्सवादरम्यान भीषण दुर्घटना घडली आणि यात 150 हून अधिक लोक जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं. थय्यम नावाच्या उत्सवावेळी 500 हून अधिक नागरिकांचा सहभाग होता. पण, इथं आतषबाजीदरम्यान भयंकर अपघात घडल्याचं पाहायला मिळालं.