नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना घडली आहे. बशीरहाटमधल्या संदेशखलीमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तृणमूलचा एक आणि भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मात्र भाजपाने सर्व मृत भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे. तसेच चार कार्यकर्ते बेपत्ता असल्याचा भाजपाने दावा केला आहे.  सुकांत मंडल, प्रदीप मंडल आणि तपन मंडल अशी मृत भाजपा कार्यकर्त्यांची नावे असल्याचे भाजपाने ट्विट करून सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचप्रमाणे शंकर मंडल, देबदास मंडल, संजोग मंडलसह चार कार्यकर्ते गायब असल्याचा दावा करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे वादळ शमण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. फक्त पश्चिम बंगालमध्येच नाही तर देशातील अन्य राज्यांमध्ये सुद्धा अनेक नेत्यांची हत्या करण्यात आली आहे.


देशातील अनेक भागात होत असलेल्या नेत्यांच्या हत्यांच्या निषेधार्थ भाजपा नेते मुकुल रॉय बोलले की,'टीएमसीच्या नेत्यांनी बशीरहाटमधल्या संदेशखलीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर प्रणघातक हल्ला केला आहे. आमच्या तीन कार्यकर्त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.'



त्याचप्रमाणे मुकुल रॉय यांनी ट्विटरच्या माध्यमातून तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. 'पश्चिम बंगालच्या संदेशखलीमध्ये ३ भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. तृणमुलच्या गुडांनी त्यांची गोळी झाडून हत्या केली आहे. ममता बॅनर्जी भाजप कार्यकर्त्यांच्या हत्ये मागे जबाबदार आहेत.' असे ट्विट भाजपा नेते मुकुल रॉय यांनी केले आहे.