नवी दिल्ली : १५ ऑगस्टच्या दिवशीही सीमेवर भारत-पाकिस्तान दरम्यान गोळीबार करण्यात आला. पूँछ आणि राजौरीमध्ये पाकिस्ताननं सीमेवर पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन केलं. इतकंच नाही तर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पाकिस्तान सेनेकडून 'एलओसीवर झालेल्या गोळीबारात पाच भारतीय सैनिकांना ठार' करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. परंतु, भारतानं मात्र पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावलाय. या चकमकीत पाकिस्तानचे तीन सैनिक मारले गेलेत आणि महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट पाकिस्ताननंही मान्य केलीय. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी सायंकाळी ५.०० वाजल्याच्या सुमारास या चकमकीला सुरुवात झाली.  पाकिस्तान सशस्र दलाच्या प्रवक्त्यांनी DG ISPR या ट्विटर हॅन्डलवरून माहिती देताना, 'काश्मीरच्या सध्याच्या परिस्थितीवरून लक्ष हटवण्यासाठी भारतीय सेनेने एलओसीवर गोळीबार केला. तीन पाकिस्तानी सैनिक शहीद झाले. पाकिस्तानी सेनेनं प्रत्यूत्तर दिलं. यात पाच भारतीय सैनिक ठार झाले. अनेक जखमी झाले तर बंकरही नष्ट करण्यात आले. गोळीबार अजूनही सुरू आहे' असं जाहीर करण्यात आलं. 



परंतु, भारतानं मात्र पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला. 'पाकिस्तान सेनेनं शस्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर प्रत्यूत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे तीन सैनिक मारले गेले. उरी आणि राजौरी सेक्टरमध्ये अजूनही शस्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे' असं भारतीय सेनेच्या सूत्रांनी म्हटलंय.