Doda Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील रियासीनंतर दहशतवाद्यांनी पुन्हा दोन ठिकाणी हल्ले केल्याचं समोर आलं आहे. गेल्या 48 तासांमध्ये 3 दहशतवादी घटना घडल्या आहेत. जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यात मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ज्यामध्ये लष्कराने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. यानंतर डोडा जिल्ह्यातील छतरकला भागात लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. कठुआमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एडीजीपी जम्मू यांनी एका दहशतवाद्याला ठार केल्याच्या बातमीची पुष्टी केली असून कारवाई सुरू आहे. तर रविवारी देखील शिव खोडी मंदिरापासून कटरा याठिकाणी भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. ज्यामध्ये 10 जण ठार झाले होते तर 41 जण जखमी झाल्याची माहिती आहे.


डोडामध्ये आतंकवाद्यांसोबत चकमक सुरु


जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील चतरगळा भागात दहशतवाद्यांनी 4 राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या चौकीवर गोळीबार केला. 


कठुआमध्ये एक दहशतवादी ठार


मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील एका गावात हल्ला केला, त्यानंतर सुरक्षा दलांनी एका संशयित पाकिस्तानी दहशतवाद्याला चकमकीत ठार केलं आहे. यामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. या दहशतवाद्यांनी सीमेपलीकडून घुसखोरी केल्याची माहिती आहे. हिरानगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जणं जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी हिरानगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी हिरानगर सेक्टरमधील कुटा मोडजवळील सैदा सुखल गावात हल्ला केला. त्यानंतर करण्यात आलेल्या शोध मोहिमेत एक दहशतवादी मारला गेला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक एके रायफल आणि एक बॅग जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय या मारला गेलेला दहशतवादी आणि त्याच्या गटाची ओळख पटवली जात असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.