साहिलच्या मर्डर लिस्टमध्ये पाच जणांची नावे, आरोपीने पोलिसांसमोर थेट नावेच घेतली
Delhi Murder Case: मर्डर लिस्टमध्ये पीडितेव्यतिरिक्त अन्य पाच जणांची नावे असल्याचा खुलासा समोर आला आहे. साहिलने पोलिसांसमोर थेट नावेच घेतली आहेत
नवी दिल्लीः दिल्ली हत्याकांडात अनेक नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली आहे. न्यायालयात साहिल सातत्याने जबाब बदलत आहे. त्यामुळं साहिलला शिक्षा मिळवून देण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. इतकेच नव्हे तर, या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे साहिलने केले आहेत. साहिलला फक्त पीडितेला ठार करायचे नव्हते. तर, त्याच्या मर्डर लिस्टमध्ये पाच जणांची नावे होती. गुन्हा घडला त्या दिवशी त्या पाच जणांपैकी कोणीही त्याच्या समोर आले असते तर त्याने त्याची हत्या केली असती.
सोमवारी दिल्लीत १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूने तब्बल २०पेक्षा अधिक वार करण्यात आले. नंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. तर, आरोपी साहिलला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. सध्या साहिल पोलिस कोठडीत आहे. पोलिस जबाबात त्याने आत्तापर्यंत अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे.
साहिलने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबानुसार, त्याने हत्येचा प्लान ३-४ दिवसांपूर्वीच बनवला होता. त्याच्या निशाण्यावर पीडितेव्यतिरिक्त अन्य चार जण होते. गुन्हा घडला त्यादिवशी त्याच्या समोर जो आला असता त्याला त्याने ठार केले असते, असं सूत्रांनी दिलेल्या माहितीत समोर आलं आहे. साहिलच्या मर्डर लिस्टमध्ये पीडितेव्यतिरिक्त प्रवीण आणि अन्य तीन युवकांची नावे आहेत.
पोलिस तपासानुसार, साहिल आणि पिडीता मागील तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. हत्येच्या काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये भांडण झाले होते. सूत्रांनुसार, हत्येच्या चार दिवसांपूर्वी साहिलने पीडितेला धमकी दिली होती. तीने अन्य मुलांसोबत बोलू नये, अशी साहिलने तिला धमकी दिली होती. मात्र, पीडितेने त्याचं म्हणणं ऐकलं नाही. म्हणूनच त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर पीडितेने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्याचा इशाराही दिला होता.
दिल्ली हत्याकांडात प्रवीणचे नावही समोर येत आहे. पीडिता याआधी प्रवीणसोबत बोलत होते. तिच्या इन्स्टाग्राम चॅटमध्ये साहिलच्या व्यतिरिक्त प्रवीणचेही नाव समोर आले आहे. सूत्रांनुसार, पोलिस प्रवीणचीही चौकशी करणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण सध्या जौनपुरमध्ये आहे. प्रवीण आणि साहिल एकत्रच राहत होते. मात्र, नंतर कामाच्या शोधात प्रवीणने दिल्ली सोडली.
साहिल सतत जबाब बदलत आहे. त्यामुळं चौकशीसाठी पोलिसांनी त्याची कोठडी वाढवून मिळण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. कोर्टाने साहिलची पोलिस कोठडी तीन दिवसांसाठी वाढवली आहे. तर, पोलिसांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी पुन्हा क्राइम सीन रिक्रिएट केला आहे.