देशात मागील २४ तासात सापडले ५ हजार कोरोना रुग्ण
३४ हजार १०९ रुग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब
नवी दिल्ली : लॉकडाऊन ३ चा आजचा शेवटचा दिवस असून आज लॉकडाऊन ४ ची घोषणा होण्याची शक्यता आहे. तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मागच्या २४ तासात देशामध्ये ५ हजार रुग्ण सापडल्याचे निदर्शनास आले आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९० हजार ९२७ झाली आहे. यामध्ये ५३ हजार ९४६ रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. दरम्यान २, ८७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. ३४ हजार १०९ रुग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने याबद्दल माहिती दिली आहे.
लॉकडाऊन ४ संदर्भात आज केंद्रीय गृह विभागाचे निर्देश येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाऊन ४ हा पूर्णपणे नवा असेल असेही ते म्हणाले. यामध्ये अनेक प्रकारचे बदल आणि सवलती दिल्या जातील असेही ते म्हणाले होते.
भारतातही करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारी लस शोधण्यासाठी संशोधन सुरु आहे. केंद्र सरकारने करोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी पीएम केअर्स फंडातून १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. बायोटक्नोलॉजी विभागाच्या माहितीनुसार वैद्यकीय संस्था, स्टार्ट अप यांच्या माध्यमातून लस संशोधनाच्या २५ प्रकल्पांवर भारतात काम सुरु आहे.
काय असतील बदल ?
नागरिकांना स्वत:चे आरोग्य आणि सुरक्षेची काळजी स्वत: घ्यावी लागेल.
केंद्राकडून राज्यांना अनेक गोष्टीत निर्णय घेण्याची मुभा दिली जाईल.
ग्रीन झोनमध्ये प्रवास आणि उद्योगांसाठी परवानगी मिळू शकते.
ग्रीन झोनमध्ये बस आणि टॅक्सीसाठी परवानगी मिळू शकते.
प्रवासी ट्रेनला सध्या परवानगी नाही.
स्पेशल ट्रेन आणि श्रमिक ट्रेन पहिल्याप्रमाणे सुरु राहील
१८ मेपासून ठराविक ठिकाणी विमान सेवा सुरु होण्यावर विचार केला जाईल.
झी २४तासचे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या मुलाखतीत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सर्वांपुढे मांडले. यातच त्यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याविषयीच्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. या टप्प्यात ग्रीन झोन पूर्णपणे सुरु राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, ऑरेंज झोनमध्येसुद्धा कंटेन्मेंट क्षेत्र वगळता इतर भाग हा सुरु केला जाऊ शकतो. राज्यात अनेक जिल्हे आणि गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे या भागांमध्ये बऱ्याच अंशी लॉकडाऊनला शिथिलता दिली जाऊ शकते असं ते म्हणाले.
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर त्यातही जर कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसला तर, ऑरेंज आणि ग्रीन अशा झोमध्येही लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यात येईल असं म्हणत वास्तवदर्शी परिस्थिती आरोग्यमंत्र्यांनी सर्वांपुढे ठेवली. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काही निर्णय घेतले जाणार असले तरीही यामध्ये नागरिकांचे प्राणही त्याहून महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सुवर्णमध्य साधतच पुढची पावलं उचलली जाणार असल्याचं म्हणत राजेश टोपे यांनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा कसा असेल याबाबतची माहिती दिली.