नवी दिल्ली: एकीकडे दिवसागणिक देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक दिलासादायक माहिती दिली आहे. देशातील २३ राज्यांतील ५४ जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जगभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा एकूण वेग पाहता ही बाब भारतासाठी अत्यंत दिलासादायक मानली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

...म्हणून सरकारने ऐनवेळी ई-कॉमर्स कंपन्यांना घरपोच डिलिव्हरीची परवानगी नाकारली

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १५७१२ इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे १३३४ नवे रुग्ण आढळून आले. तर २७ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाचे २२३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशातच आता देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत कोरोनाचा नवा रुग्ण सापडला नसल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी अशा जिल्ह्यांची संख्या ४७ इतकी होती. मात्र, लॉकडाऊन आणि इतर सरकारी उपाययोजनांमुळे आता परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत आहे. 


गावाला कोरोनापासून वाचवण्यासाठी तरुणाने कापली स्वत:ची जीभ

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आज मध्यरात्रीपासून कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल होणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध कायम असतील. येत्या ३ मेपर्यंत धार्मिक स्थळ आणि अन्य कार्यक्रमांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, हे करताना कोणतीही चूक घडता कामा नये, असे लव अग्रवाल यांनी सांगितले. 



दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी देशभरात ७५५ कोविड-१९ रुग्णालयांची निर्मिती करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय, कोरोनावरील उपचारांसाठी देशभरात आतापर्यंत १३८९ आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच जगभरातील कोरोनाच्या एकूण प्रादुर्भावाचा अभ्यास केल्यास लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांना कोरोना होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आपण कोरोनाच्या अशा हायरिस्क रुग्णांवर लक्ष ठेवून असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.