शिमला : हिमाचल प्रदेशच्या किन्नौर भागातील भारत- चीन सीमेजवळ झालेल्या हिमस्खलनात सैन्यातील सहा जवानांना त्यांचे प्राण गमवावे लागल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली. इतकच नव्हे, तर आयटीबीपीचे पाच जवानही या हिमस्खलनात अडकल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आलेल्या हिमस्खलनाचा शिकार झालेल्या या जवानांपैकी एकाचा मृतदेह हाती लागला आहे, पण इतर पाचजणांचा शोध अद्यापही सुरुच असल्याची माहिती किन्नौरचे उपायुक्त गोपाल चंद यांनी दिली. दरम्यान, ज्या जवानाचा मृतदेह हाती लागला आहे, त्यांचं नाव राकेश कुमार असून, त्यांचं वय ४१ वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. ते मुळचे हिमाचल प्रदेशच्या घुमरपूर येथील असून, ७ जम्मू काश्मीर रायफल्सच्या तुकडीत कार्यरत असल्याची माहिती पोलीस अक्षिक्षक साक्षी वर्मा यांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला दिली. 



सैन्यदलाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार नामगया पोस्टहून जवळपास १६ जवान एका जलवाहिनीच्या कामासाठी शिपकी ला च्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी हे संकट ओढावलं. सध्या जवानांचा शोध घेण्याचं काम सुरू असून सर्व जवान सापडेपर्यंत हे काम सुरूच राहिल अशी माहिची सैन्यदलाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात येत आहे. एकूण १५० जवानांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, बचावकार्य वेगाने सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे.