पावसाचा कहर: उत्तर प्रदेशमध्ये ६० जणांचा मृत्यू
यमुना नदीला पूर आलाय. हवामान खात्यानं सोमवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवलाय.
नवी दिल्ली: उत्तर भारतात पावसानं कहर केलाय. उत्तर प्रदेशमध्ये तीन दिवसात ६० जणांचा मृत्यू झालाय. मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचलंय. नद्यांना पूर आलाय. त्यामुळ जनजिवन विस्कळीत झालंय. जोरदार पाऊस आणि पुरस्थितीत ५ राज्यात मिळून एकूण ४६५ जणांचा मृत्यू झालाय. गृह मंत्रालयाच्या एनईआरसी विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात १३८ जणांचे पावसाने बळी घेतलेत. तर केरळमध्ये १२५, प. बंगालमध्ये ११६, गुजरातमध्ये ५२ तर आसाममध्ये ३४ जणांचा मृत्यू झालाय.
दिल्लीला सतर्कतेचा इशारा
मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर दिल्लीमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आलाय. हथिनीकुंड येथून येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे दक्षतेचा इशारा प्रशासनानं दिलाय. गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार आहे. त्यामुळे यमुना नदीला पूर आलाय. हवामान खात्यानं सोमवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवलाय.
यमुनेतून १ लाख ८० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
दरम्यान, यमुना नदीत हथिनीकुंड बॅरेजमधून एक लाख ८० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलंय. यामुळे यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडलीय. या पार्श्वभूमिवर दिल्लीत विविध शासकीय विभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.