Babies Born In Bengal Prisons: पश्चिम बंगालच्या तुरुंगात महिला कैद्यांनी मुलांना जन्म दिल्याच्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात न्याय मित्रने अहवाल सादर केला आहे. न्याय मित्र (Amicus Curiae) ने सर्वोच्च न्यायालयात म्हटलं आहे की, गेल्या चार वर्षांत बंगालच्या तुरुंगात 62 मुलांचा जन्म झाला आहे. विशेष म्हणजे, तुरुंगात आणल्यानंतर ज्या महिलांनी मुलांना जन्म दिला त्यातील बहुतांश महिला या आधीच गर्भवती होत्या. या प्रकरणावर अलीकडेच उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. 


तुरुंगात महिला गर्भवती राहिल्याचा आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकत्ता उच्च न्यायालयात न्याय मित्र तपास भांजा या समितीने 196 मुलांचा जन्म झाल्याचा हवाला देत कोर्टात अहवाल सादर केला होता. या अहवालात म्हटलं होतं की, महिला कैदी गजाआड असताना गर्भवती होत आहे. भांजाने राज्य सुधार गृहातील पुरुष कर्मचाऱ्यांना महिलांच्या कोठडीत जाण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, हा अहवाल समोर येताच राज्यात एकच खळबळ उडाली होती. 


पश्चिम बंगालच्या तुरुंगात असलेल्या महिला कैद्यांनी एमिकस अहवालाचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा आरोप अतिशय बेजबाबदारपणे केला होता. या प्रकरणी चौकशीदेखील करण्यात आली होती. यात राज्य तुरुंग विभाग आणि महिला आयोगदेखील सहभागी होते. या चौकशीत आढळले की सर्व मुलं हे त्या महिलांचे होते ज्यांची जेलमध्ये जाण्याच्या आधी किंवा पेरॉलवर असताना गर्भधारणा झाली होती.


जेष्ठ वकील गौरव अग्रवाल यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानुसार, बहुतांश महिला कैदी तुरुंगात येण्याच्या आधीच गर्भवती होत्या. काही प्रकरणात ज्या महिला कैदी पेरॉलवर बाहेर होत्या तेव्हा त्या गर्भवती होऊन पुन्हा जेलमध्ये आल्या होत्या. 


गौरव अग्रवाल यांनी पुढे म्हटलं आहे की, गेल्या 4 वर्षात पश्चिम बंगालच्या जेलमध्ये 62 मुलं जन्माला आले आहेत. अग्रवाल यांनी म्हटलं आहे की, महिलांसाठी तुरुंगात सुरक्षा उपाय समजून घेण्यासाठी राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीच्या तुरुंगातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. तत्पूर्वी, उच्च न्यायालयाच्या ॲमिकस क्युरी यांनी आपल्या अहवालात म्हटले होते की, देशातील महिला कारागृहे आणि महिला बॅरेक्सचे संपूर्ण सुरक्षा ऑडिट करण्याची गरज आहे. महिला कारागृहांमध्ये प्रवेशाच्या वेळी आणि नियमित अंतराने महिलांची योग्य प्रकारे तपासणी व्हावी यासाठी महिला कारागृहातील वैद्यकीय सुविधांचीही तपासणी करण्याची गरज आहे.