अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये मोठे बदल
केंद्र सरकारकडून हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्यानंतर....
श्रीनगर : जम्मू- काश्मरीमध्ये लागू करण्यात आलेलं अनुच्छेद ३७० ऑगस्ट महिन्यामध्ये हटवण्यात आलं. केंद्र सरकारकडून हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्यानंतरच्या काळाता या भागात जवळपास ३२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर, सुरक्षा दलांकडून १० दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये या भागातील १९ नागरिकही मारले गेल्याची माहिती समोर येत आहे.
अनुच्छेद ३२० हटवल्यानंतर या ठिकाणी परिस्थिती बऱ्याच अंशी बदलली असून, या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव तैनात असणाऱ्या जवानांना वीरगती येण्याच्या प्रमाणातही लक्षणीय घट झाली आहे. बुधवारी गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार या भागात जवानांच्या जीवाला असणारा धोका हा तब्बल ७३ टक्क्यांनी कमी झाला आहे.
रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला जम्मू काश्मीरमध्ये काहीजण ताब्यात असून, त्यामध्ये कोणही अल्पवयीन नाही. शिवाय अनुच्छेद हटवल्यानंतर येथे अराजकत पसरवणाऱ्या आणि दहशतवादी कारवाया, संघटनांसाठी काम करणाऱ्या जवळपास ६,६०५ लोकांना ताब्यात घेण्यात आलं.
वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी
अर्थव्यवस्थेतही सकारात्मक बदल
सुरक्षा दलांसंबंधी माहिती देण्यापूर्वी रेड्डी यांनी जम्मू आणि काश्मीर भागातील अर्थव्यवस्थेतही सकारात्मक बदल झाल्याची माहिती दिली. अनुच्छेद ३७० हद्दपार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात शेतीला बरीच चालना मिळाली आहे. शिवाय स्थानिक शेतमाल उत्पन्नातही वाढ झाली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात जानेवारी महिन्यापर्यंत १८.३४ लाख मॅट्रिक टन सफरचंदांची निर्यात करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. हस्तशिल्प आणि रेशीम वस्त्रोद्योगातही प्रगती पाहायला मिळाली.