केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बातमी! उद्या कॅबिनेटमध्ये DA वाढीबाबत मोठा निर्णय अपेक्षित
7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्याचा निर्देशांकांची सरासरी 351.33 झाली आहे. सरासरी निर्देशांकांवर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो. या आर्थिक वर्षातील शेवटच्या कॅबिनेट बैठकीत त्याबाबत निर्णय होऊ शकतो.
मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेंशनर्ससाठी चांगली बातमी आहे. उद्या म्हणजेच बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत सरकार डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. याशिवाय 18 महिन्यांची थकीत डीए एरियरवर देखील निर्णय होऊ शकतो.
या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या बैठकीत निर्णय शक्य
बुधवारी 30 मार्च 2022 ला या आर्थिक वर्षातील शेवटची कॅबिनेट बैठक होणार आहे. या बैठकीत डीएमध्ये 3 टक्के वाढ देण्याचा निर्णय होऊ शकतो. हा निर्णय मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या पगारासह नवीन डीए खात्यात जमा होईल. महागाई भत्त्यात वाढीसोबतच जानेवारी-फेब्रुवारीची थकबाकीही दिली जाईल. महागाई भत्त्यात एकूण 3% वाढ झाली आहे. सध्या 31 टक्के डीए मिळत आहे.
3% ची वाढ निश्चित
महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित मानली जात आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता मिळू शकेल. म्हणजेच जानेवारी 2022 पासून एकूण महागाई भत्ता 34% असेल.
नोव्हेंबरमध्ये शेवटची वाढ
कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, AICPI-IW निर्देशांक नोव्हेंबर 2021 मध्ये 0.8% वाढला होता आणि 125.7 वर पोहोचला होता. यावरून महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले.
आता डिसेंबर 2021 च्या आकड्यात थोडीशी घट झाली असली तरी जानेवारी 2022 मध्ये डीएमध्ये 3 टक्के दराने वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए सध्या 31 टक्के आहे. आता 3 टक्क्यांच्या वाढीनंतर तो 34 टक्क्यांवर पोहोचेल.