नवी दिल्ली: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लवकरच सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेतनात असलेला फरक संपुष्टात येणार आहे. परिणामी भविष्यात एकाच वर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळेल. यापूर्वी लागू करण्यात आलेल्या सहाव्या वेतन आयोगानुसार एकाच श्रेणीच्या दोन अधिकाऱ्यांच्या वेतनात फरक होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आता सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर ही परिस्थिती बदलणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात तीन टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर आता त्यांचे वेतन समान पातळीवर येईल. 


उदाहरणार्थ सहाव्या वेतन आयोगानुसार दोन वेगवेगळ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे वेतन अनुक्रमे ७२१० आणि ७४३० रुपये असेल तर सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पहिल्या कर्मचाऱ्याचे वेतन १८५३० आणि १९०९५ इतके झाले पाहिजे. मात्र, सातव्या वेतन आयोगाच्या तक्त्यानुसार या दोन्ही कर्मचाऱ्यांना १९१०० इतके समान वेतन मिळेल. १ जानेवारी २०१९ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 


याशिवाय, सहाव्या वेतन आयोगानुसार ज्या कर्मचाऱ्याचे वेतन १८००, १९०० २०००, २४००, २८०० आणि ४२०० यापेक्षा कमी असेल त्यांनाही सातव्या वेतन आयोगातील बंचिगचा लाभ मिळणार आहे.