Mini Vande Bharat Train: वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Train) अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. भारतातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) धावत आले. वेग आणि अलिशान ट्रेन असलेली वंदे भारत शताब्दी (Shatabdi Express) आणि राजधानी (Rajdhani Express) एक्स्प्रेसपेक्षा वेगाने धावते. भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारतमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आत्तापर्यंत वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 16 डब्बे आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत तुम्ही 8 डब्ब्यांची वंदे भारत ट्रेनही पाहू शकणार आहे. याला मिनी वंदे भारत ट्रेन असं म्हणतात. येत्या काही दिवसांत 40 मार्गांवर ही ट्रेन धावणार आहे. (Mini Vande Bharat Train News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या वंदे भारत एक्स्प्रेसला 16 डब्बे आहेत. आगामी काही दिवसांमध्ये आठ डब्ब्यांची वंदे भारत पाहायला मिळणार आहे. रेल्वे मंडळाने अशा गाड्या बनवण्याचे निर्देश चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीला दिले आहेत. सर्वसामान्यांनाही वंदे भारतच्या प्रवासाचा अनुभव मिळावा व तिकिट परवडावे हा त्यामागचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. सुरुवातीला दिल्ली-चंदीगड, चेन्नई- तिरुनलवेली, लखनऊ-प्रयागराज आणि ग्वाल्हेर-भोपाळ या मार्गावर मिनी वंदे भारत सुरु करण्याची तयारी रेल्वेकडून करण्यात आली आहे.


सध्याच्या वंदे भारतमधील दोन डबे ड्रायव्हर कॅब म्हणजेच इंजिनचे डबे आहेत. तर, दोन एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे आहेत. बाकीचे डबे एसी चेअर कार आहेत. अनेक मार्गावर वंदे भारतच्या तिकिटांमुळं प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळं भारतीय रेल्वेकडून अलीकडेच वंदे भारतच्या तिकिटदरांत कपात करण्यात आली होती. त्याचबरोबर प्रवासी संख्या वाढवण्यासाठी मिनी गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोधपूर- साबरमती मिनी 'वंदे भारत'ला नुकताच हिरवा झेंडा दाखवला होता. या गाडीचा सरासरी वेग ताशी ८० किमी असला तरी ती ताशी १६० किमी वेगानेही धावू शकते. या नव्या गाड्यांचा पुढचा भागही एरोडायनामिक आकाराचा आहे. जास्त वेग गाठण्यासाठी ही रचना करण्यात आली असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


वंदे भारतमध्ये स्लीपर कोच 


चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची बांधणी करण्यात आली आहे. वेगवान प्रवासाच्या दृष्टीने वंदे भारत एक्स्प्रेस तयार करण्यात आली आहे. कमी तास आणि कमी अंतरासाठी तयार करण्यात आलेल्या या एक्प्रेसमध्ये आसन श्रेणीची व्यवस्था आहे. रेल्वे मंडळाने आता आयसीएफला स्लीपर कोच असणाऱ्या वंदे भारतची निर्मिती करण्याची सूचना केली आहे. या नव्या वंदे भारत एक्स्प्रेस डिसेंबर अखेरपर्यंत सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.