हॉटेलच्या रूममध्ये ८ भारतीय पर्यटकांचा मृतदेह
सर्व पर्यटक केरळमधील आहेत.
काठमांडू : नेपाळच्या दमन येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या ८ पर्यटकांचा मृतदेह एका हॉटेलमध्ये अढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही घटना एव्हरेस्ट पॅनोरमा रिसॉर्टमध्ये घडली आहे. हा रिसॉर्ट मकवापूर जिल्ह्यातील दमन येथे स्थित आहे. मीडिया रिपोर्टनुसार रूममध्ये गॅस हीटर वापरल्यानंतर गुदमरल्यामुळे पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याचं समोर येत आहे.
मकवानपूरचे एसपी सुशीलसिंग राठोड यांनी देखील याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'रूममध्ये गॅस हीटरचा वापर हे पर्यटक करत होते. त्यामुळे गुदमरून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे' असं ते म्हणाले. हे सर्व पर्यटक केरळमधील आहेत.
त्याचप्रमाणे रिसॉर्टमध्ये मृत अवस्थेत अढळलेल्या पर्यटकांना शवविच्छेदनासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मृतांमध्ये दोन जोडपे आणि चार मुलांचा समावेश आहे. एकूण १५ भारतीय पर्यटक याठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आले होते. प्रवीण कृष्णन नायर, सरन्यासी, श्रीभद्र प्रवीण, आरचा प्रवीण, अभिनव सरन्या नायर, रंजीत कुमार आदथोलथ पुनाथिल, इंदू लक्ष्मी, पीताम्बरन रागलाथा आणि वैष्णव रंजीथ अशी मृतांची नावे आहेत.
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी ट्विट करत संवेदना व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. या प्रकरणी तेथील स्थनिक पोलिस अधिक तपास करत आहेत.