आठ वर्षांच्या चिमुरडीवर पिटबुलचा हल्ला, दात आणि पंजामारुन केले गंभीर जखमी
UP Pitbull Dog Attack: पिटबुलच्या हल्ल्यात एक आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
UP Dog Attack News: पाळीव कुत्र्यांनी लहान मुले आणि जेष्ठांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमध्येही असाच प्रकार पुन्हा घडला आहे. घराच्या बाहेर खेळणाऱ्या आठ वर्षांच्या चिमुकलीवर एका पिटबुल जातीच्या कुत्र्याने हल्ला (Dog Attack) केला आहे. या हल्ल्यात ती जबर जखमी झाली आहे. (Pitbull Dog Attack On Girl)
सायकल चालवत असताना हल्ला
समोर आलेल्या माहितीनुसार, पिटबुलच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीचं नाव वर्णका आहे. ती तिच्या बहिणीसोबत घराच्या बाहेर सायकल चालवत होती. तर, शेजारी राहणारा मुलगा त्याच्या पिटबुल कुत्र्याला फिरवत होता. त्याचवेळी तिथे धावत आलेल्या पिटबुल कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर ती सायकलवरुन खाली पडली. वर्णिका खाली पडल्यानंतर पिटबुलने तिला जागोजागी चावा घेतला आहे. तिच्या शरिरावर जागोजागी दातांनी आणि पंजाने वार केले आहेत. त्यात ती गंभीर जखमी झाली आहे.
कुत्र्याने तिचे लचके तोडले
पिटबुलने हल्ला केल्यानंतर वर्णिका आणि तिच्या बहिणीने आरडा-ओरडा केला. दोघींचा आवाज ऐकून घरातील लोक धावत आले. तेव्हा पिटबुल वर्णिकाच्या शरिराचे लचके तोडत होता. समोरचे दृश्य पाहून तिच्या कुटुंबीयांच्या अंगाचा थरकाप उडाला. त्यांनी लगेचच तिथे धाव घेत कुत्र्याच्या तावडीतून तिला सोडवले.
वर्णिका जागेवरच बेशुद्ध झाली
पिटबुलच्या हल्ल्यात वर्णिका गंभीर जखमी झाली आहे. तिला लगेचच रुग्णालयात दाखल केले. मोठ्या प्रमाणात रक्त गेल्याने वर्णिका बेशुद्ध झाली आहे, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्णिकाचे वडिल सुधीर मलिक हे उत्तर प्रदेश पोलिस दलात पोलिस कॉन्सटेबल म्हणून कार्यरत आहेत.
या आधीही केला होता हल्ला
दरम्यान, पिटबुलच्या त्रासाला परिसरातील इतर लोकही वैतागले आहेत. कॉलनीत राहणाऱ्या इतर रहिवाशांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसंच, कारवाईचीही मागणी केली आहे. कॉलनीतील रहिवाशांच्या माहितीनुसार, याआधीही या कुत्र्याने अनेकांवर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले आहे. पोलिस सध्या त्याच्या मालकाचा शोध घेत आहेत.
१२ दिवसांत दुसरा हल्ला
दरम्यान, १८ मे रोजीही मेरठमधील खरखौदा क्षेत्रात अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. पिटबुलने ९ वर्षांच्या सूफियानवर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले होते. पिटबुलने त्याच्या शरिरावर असंख्य चावे घेतले आहेत.