नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर अनेक नागरिकांकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे येत आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी 'भारत के वीर' या बॅंक खात्यात लोकांनी करोडो रूपयांची मदत केली आहे. गेल्या महिन्यात १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यानंतर भारतीयांकडून करण्यात आलेल्या मदतीतून शहीद जवानांच्या खात्यात आतापर्यंत ८० करोड रूपये जमा झाले आहेत. याआधी गेल्या दोन वर्षांत २० करोड रूपयांची मदत नागरिकांकडून करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भारत के वीर'शी जोडलेल्या एका अधिकाऱ्याने 'सामान्य देशवासी ज्याप्रमाणे आपल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांची मदत करत आहेत ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. ज्या कुटुंबियांनी आपल्या लोकांना गमावले आहे त्यांना आपण एकटे नसून संपूर्ण देश त्यांच्यासोबत असल्याचे' म्हटले आहे.


सुरक्षादलातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लोकांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. 'भारत के वीर'शी जोडलेल्या कोणत्याही कुटुंबाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा झाल्यास 'भारत के वीर'मधून त्या शहीद जवानाच्या कुटुंबाचे नाव हटवले जाईल. त्यामुळे ज्या कुटुंबांना १५ लाख रूपयांची मदत मिळाली नाही त्या कुटुंबियांच्या खात्यात 'भारत के वीर'मधील पैसे जमा केले जाणार आहेत. 


पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यानंतर देशातील नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. देशभरातील जनता जवानांना अनेक प्रकारे मदत करत आहे. भारतीयांचे  जवानांप्रती असलेले प्रेम, आदर दिवसेंदिवस अनेक घटनांमधून व्यक्त होताना दिसत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफच्या ट्विटर अकाउंटच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ झाली आहे. पुलवामा हल्ल्याआधी फॉलोअर्सची संख्या २ लाख ७५ हजार इतकी होती. परंतु हल्ल्यानंतर फॉलोअर्सची संख्या ४ लाख २५ हजारांवर पोहचली आहे.