`जेट एअरवेज`चा डोलारा कोसळला, ९० टक्के उड्डाणं बंद
जेटच्या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी सचिवांना दिलेत
मुंबई : कर्जात बुडालेल्या 'जेट एअरवेज'नं मुंबईतून लंडन, ऍम्स्टरडॅम आणि पॅरिसला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं अचानक रद्द केल्यामुळं शेकडो प्रवाशांचा खोळंबा झालाय. संतापलेल्या प्रवाशांनी मुंबई विमानतळावर प्रचंड गोंधळ घातलाय. मुंबई विमानतळावर पर्यटक आणि टूर कंपनीच्या कर्मचाऱ्यात मोठा वाद झाला. कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे पर्यटक वाऱ्यावर अशी स्थिती दिसून येत आहे. कर्जात बुडालेल्या जेट एअरवेजची आता केवळ १४ विमानं सेवेत आहेत. जेटची अनेक देशांतर्गत उड्डाणंदेखील रद्द करण्यात आली आहेत. नाशिक-दिल्ली विमानसेवाही बंद ठेवण्यात आलीय. कालच्या सत्रात जेटचा समभाग सुमारे दीड टक्क्यांनी घसरला. जेटच्या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी सचिवांना दिलेत.
गुरुवारी या कंपनीच्या केवळ १४ विमानांनी उड्डाण घेतलं होतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक संकटांनी घेरलेल्या 'जेट एअरवेज'ला अद्याप १५०० करोड रुपयांची मदत अजूनही मिळू शकलेली नाही.
नागरी विमानचालन महासंचलनालयानं (DGCA) जेट एअरवेजच्या आठ विमानांची नोंदणी रद्द केलीय. या विमानांना आता दुसऱ्या एअरलाइनला भाड्यानं देऊन उड्डाणं सुरू केली जाऊ शकतात. उड्डाणं कमी होऊन त्याचा ताण प्रवाशांच्या खिशावर पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
दुसरीकडे, जेट एअरवेजचे माजी संचालक नरेश गोयल कंपनीतला आपल्या समभागासाठी पुन्हा बोली जमा करत आहेत. गोयल यांनी कंपनीतली आपली २६ टक्क्यांचा समभाग पीएनबीकडे गहाण ठेवलीय. कर्जाच्या बदल्यात ही गॅरंटी बँकेला देण्यात आलीय.