भोपाळ : कोटातळा गावामध्ये जवळपास ९३ वर्षीय वयोवृद्ध महिला पंचूबाई, ज्यांना संपूर्ण गाव 'मौसी' म्हणून ओळखायचा त्या गाव सोडून निधताना साऱ्यांनाच अश्रू अनावर झाले. पंचूबाई या मुळच्या महाराष्ट्रातील. त्यांची बैद्धिक स्थिती फारशी ठीक नाही, अशा अवस्थेत ४३ वर्षांपूर्वी त्या या खेड्यात आल्या. इथं इसरार खान यांच्या वडिलांनी त्यांना आपल्या मुस्लिम वस्ती असणाऱ्या गावात आसरा दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच पंचूबाई यांचे फोटो सोशल मीडियावर अचानकच व्हायरल झाले. ज्यानंतर हे फोटो नागपूरमध्ये राहणाऱ्या पृथ्वीकुमार शिंदे यांना मिळाले. याची माहिती मिळताच आपल्या पत्नीसह ते आपल्या आजीला म्हणजेच पंचूबाई यांना आणण्यासाठी नागपुरातून थेट मध्य प्रदेशातील दामोह येथे पोहोचले. 


पंचूबाई यांचा सांभाळ करणाऱ्या या गावाचे त्यांनी सहृदय आभार मानले. 'माझ्या आजीची ४३ वर्षे सेवा केल्याबद्दल कोटातळा या गावातील सर्वच गावकऱ्यांचे मी आभार मानतो. त्यांच्यामधून आता मी आजीला घेऊन जात असल्याचं मलाही दु:ख आहे. पण, या गावकऱ्यांनी माझ्या आजीला आपल्याच कुटुंबाचा एक भाग समजला याचा मला आनंद आहे. आता आजीच्या सेवेची संधी मलाही हवी आहे', असं पृथ्वीकुमार शिंदे म्हणाल्याचं वृत्त 'क्वींट'नं प्रसिद्ध केलं आहे.


पंचूबाईंना निरोप देताना गावकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या, हे भावनेच्या बंधांचं प्रतिक असण्यासोबतच देशातील एकात्मतेचंही प्रतिक आहे, असं म्हणायला हरकत नाही. मुस्लिम समाजाची सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या या गावात कोणतीही ओळखपाळख नसताना एका हिंदू महिलेला मुस्लिम कुटुंबानं तब्बल ४३ वर्षे आसरा देणं आणि त्यांच्या जाण्याच्या वेळी सारा गाव भावुक होणं हे चित्र तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल. 


 


पंचूबाई यांचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबातील इसरार खान म्हणतात.... 


'बऱ्याच वर्षांपूर्वी मधमाशांनी हल्ला केल्यामुळं जखमी अवस्थेत माझ्या वडिलांना त्या भेटल्या होत्या. ज्यानंतर वडिलांनी त्यांना घरी आणलं, त्यांचा सांभाळ केला. वडिलांच्या निधनानंतर आम्हीसुद्धा ही परंपरा सुरुच ठेवली'
पंचूबाई यांच्या जाण्यानं गाकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले. पण, त्यांच्या मुळ कुटुंबाला आता त्यांची सेवा करायची असून, जीवनाच्या अखेरच्या या टप्प्यात त्या आपल्या कुटुंबासमेत असतील याबाबत त्यांनी आनंदी भावनाही व्यक्त केली. देशभरात जिथं धर्म आणि पंथाच्या नावावरुन अनेक वादांना वाव मिळत आहे, तिथंच ही घटना आदर्श ठरत आहे अशाच प्रतिक्रिया सोशल मीडियायवरुन या घटनेची माहिती मिळताच दिल्या जात आहेत.