एखाद्या पुस्तकाचं कव्हर पाहून त्याबद्दल मत निर्माण करु नये असं म्हटलं जातं. पण दैनंदिन आयुष्यात आपण नेहमीच समोरच्या व्यक्तीचा चेहरा, कपडे पाहून अनेक अंदाज लावत असतो. हे अंदाज अनेकदा चुकतातही आणि जेव्हा याची जाणीव होते तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. खिशात दमडी नसतानाही उगाच मित्रांमध्ये, समाजामध्ये आपली एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. यामुळेच जेव्हा खिशात अमाप पैसा असतानाही एखादी व्यक्ती अत्यंत साधी राहते तेव्हा त्यांच्याबद्दल आश्चर्य वाटणं साहजिक आहे. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरातील वडीलधारे लोक नेहमीच आपल्याला उच्च विचार आणि साधं राहणीमान ठेवा असं सांगतात. चेन्नईमधील एका बिल्डरच्या फोटोने याचा प्रत्यय दिला आहे. प्रसिद्ध बिल्डर बाशयाम युवराज यांनी भारतातील पहिल्या रोल्स रॉयस स्पेक्ट्रे ईव्ही (Rolls-Royce Spectre EV) खरेदी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान ही कार घेण्यासाठी पोहोचले असता त्यांनी अत्यंत साधे कपडे आणि चपल घातली होती. 


विशेष म्हणजे Rolls-Royce Spectre EV अद्याप भारतात लाँच झालेली नाही. पण त्याआधीच बाशयाम युवराज हे या लक्झरी कारचे मालक झाले आहेत. युवराज हे चेन्नईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. बाश्याम कन्स्ट्रक्शन्स अंतर्गत ते व्यवसाय करतात. 


एक्सवर युवराज यांच्या नव्या कारसह फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो तुफान व्हायरल झाला असून, नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. फोटोमध्ये युवराज यांनी अत्यंत साधे कपडे घातले आहेत. जीन्स आणि टी-शर्ट घातलेल्या युवराज यांनी पायात चक्क चपल घातली होती. भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत 9 कोटी रुपये असेल असा अंदाज आहे. 



हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काहींनी युवराज यांच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. तर इतरांनी या कारने आपलं लक्ष वेधून घेतल्याचं म्हटलं आहे. एका युजरने म्हटलं आहे की, "पैसा आणि स्टेटस याची अजिबात चिंता न करता चेन्नईतील लोक बिनधास्त चप्पल घालतात". एकाने त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला आहे.