उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) 38 वर्षीय मुलानेच आपल्या 60 वर्षीय विधवा आईवर बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 16 जानेवारी 2023 रोजी ही घटना घडली होती. इतकंच नाही तर आरोपी आईला आपल्याशी लग्न करुन पत्नीप्रमाणे राहण्याची जबरदस्ती करत होता. पोलिसांनी नात्याला काळीमा फासणाऱ्या आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला पोलीस बेड्या ठोकून बुलंदशहर कोर्टात नेत असल्याचा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोर्टाने आरोपाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महिलेने कोर्टात मुलाने आपल्यावर बलात्कार केल्याची साक्ष दिली आहे. तसंच आपण जर हे उघड केलं तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही सांगितलं आहे. 16 जानेवारी 2023 रोजी महिला शेतात लाकडं गोळा करण्यासाठी गेली असता तिथे मुलाने हे संतापजनक कृत्य केलं. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश वरुण निगम यांनी निकाल सुनावताना आरोपीला जन्मठेप सुनावली. तसंच ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचं म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी या शिक्षेचं कौतुक केलं आहे. 


पीडित महिलेच्या पतीचा 10 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. यानंतर त्या आपल्या दोन्ही मुलांसह राहत होत्या. 16 जानेवारीला महिला मोठ्या मुलासह लाकडं गोळा करण्यासाठी शेतात गेली होती. यावेळी मुलाने तिच्यावर  बलात्कार केला आणि कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. 



महिलेच्या लहान मुलाने घटनेच्या सहा दिवसांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आयपीसीच्या कलम 376 (बलात्कार) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात पतीच्या मृत्यूनंतर मुलाची त्याच्यासह पत्नीप्रमाणे राहण्याची इच्छा होती. "माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मुलाला माझ्यासह पतीप्रमाणे राहायचं होतं," असं पीडित महिलेने सांगितलं आहे. आपण त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो ऐकत नव्हता असं तिचं म्हणणं आहे. 


डॉक्टरांना वैद्यकीय तपासणीदरम्यान बलात्काराचा कोणताही पुरावा मिळाला नव्हता. पण कोर्टाने महिलेने दिलेली साक्ष ग्राह्य घरत हा सबळ पुरावा असल्याचं सांगितलं. कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावताना आरोपीला 51 हजारांचा दंडही ठोठावला आहे. पोलिसांनी केलेला तपास आणि सरकारच्या कायदेशीर पथकाने केलेली मदत यामुळे 19 महिन्यात आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे असं सरकारी वकील विजय कुमार यांनी दिली आहे.