Kanpur Road Accident: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भरधाव कारने स्कूटीवरुन निघालेल्या महिला आणि मुलीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, महिला 30 फूट दूर फेकली गेली. महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. दु:खद बाब म्हणजे, मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिला आपली आई या जगातच नाही याची माहितीच नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णलयात दाखल मुलीने शुद्धीत येताच जेव्हा आपल्या वडिलांना बाबा, आई कशी आहे? अशी विचारणा केली तेव्हा हतबल बाप निशब्द झाला होता. त्यांचा कंठ दाटून आला होता. पण त्यांनी स्वत:ला सांभाळलं आणि आई ठीक असून दुसऱ्या रुममधे तिच्यावर उपचार सुरु आहेत अशी खोटी माहिती दिली. गंभीर जखमी झालेल्या आपल्या मुलीला दिलासा दिल्यानंतर अनुप मिश्रा बाहेर येऊन रडू लागले होते. बाहेर असणाऱ्या नातेवाईकांनी त्यांना सांभाळलं. 


अपघातात 13 वर्षाच्या मेधावी मिश्राचा पाय, हाडं तुटली आहेत. तिचे आजी-आजोबा तिची देखभाल करत आहेत. दुसरीकडे मेधावीची आई भावना मिश्रा यांच्या मृत्यूनंतर घरात शोकाकूळ वातावरण आहे. 



काय आहे संपूर्ण प्रकरण?


एचडीएफसी  बँकेत सीनिअर मॅनेजर असणारे अनुप मिश्रा (45) केशव नगर बांके बिहारी इन्क्लेव्हमध्ये कुटुंबासह राहतात. 2 जुलैला त्यांची पत्नी भावना मिश्रा (42) आणि मुलगी मेधावी मिश्रा (13) स्कुटीवरुन बाहेर पडल्या होत्या. यादरम्यान किदवई नगर येथे एका भरधाव कारने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. एक अल्पवलयीन मुलगा हा गाडी चालवत होता. या दुर्घटनेत भावना मिश्रा यांचा मृत्यू झाला होता. तर मेधावी मिश्रा गंभीर जखमी झाल्या. 


12 वीच्या विद्यार्थी कारने फिरण्यासाठी पडला होता बाहेर


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय कारचालक 12 वीचा विद्यार्थी आहे. अपघातानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाने अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवलं असून, वडिलांना जामीन मंजूर केला आहे. 


डीसीपी रवींद्र कुमार यांनी सांगितलं की, मुलाकडे चालक परवाना नाही. चौकशीत माहिती मिळाली की, तो आपल्या मित्रांसह कारमध्ये स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता. कारमधील इतर 3 अल्पवयीन आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले होते.


हा अल्पवयीन विद्यार्थी त्याच्या वडिलांच्या गाडीतून शाळेत जात असे, असे पोलीस तपासात समोर आले आहे. अपघाताच्या दिवशीही तो शाळेला दांडी मारुन मित्र आणि मैत्रिणीसोबत गंगा बॅरेजला फिरण्यासाठी जात होता. यावेळी तो रस्त्यावर स्टंट करू लागला. कारमधून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीसह इतर मुलींनी शाळेचा ड्रेस बदलून इतर कपडे घातले. पोलिसांना कारमधून मुलींच्या कपड्यांच्या दोन जोड्या सापडल्या आहेत. अपघातानंतर मुलींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. जमावाने कार चालवणाऱ्या अल्पवयीन व त्याच्या साथीदाराला पकडून बेदम मारहाण केली.