उत्तर प्रदेशातील एका घटनेने राज्यातील आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टरने सर्जरी केल्यानंतर सुई तरुणीच्या डोक्यातच ठेवली होती. 18 वर्षीय तरुणीच्या डोक्याला टाके लावण्यात आले होते. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणात सितारा जखमी झाली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंत तिला कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी यावेळी तिच्या डोक्याला टाके लावण्याची गरज असल्याचं सांगितलं. डॉक्टर आणि आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. तिच्या डोक्याला टाके लावून आणि पट्टी लावून घरी पाठवलं. 


घरी गेल्यावर तरुणीला प्रचंड वेदना होत असल्याने ती विव्हळत होती. यानंतर कुटुंबीयांना तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तिचे टाके काढून जखम पुन्हा एकदा तपासली. यावेळी डोक्यात सुई असलेली पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सुई काढल्यानंतर तरुणीला होणाऱ्या वेदना कमी झाल्या. 


आरोग्य केंद्रातील डॉक्टर मद्याच्या प्रभावाखाली होते असा आरोप तरुणीच्या आईने केला आहे. "कोणावरही अशी परिस्थिती येऊ नये अशी आमची इच्छा आहे. आम्ही कारवाईची अपेक्षा करत आहोत." असं त्या म्हणाल्या आहेत. तरुणीच्या आईने डॉक्टरांनी डोक्यातून काढलेली सुईदेखील दाखवली आहे. 


हापूर जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ सुनील त्यागी यांनी सांगितले की, त्यांना सामुदायिक आरोग्य केंद्रातील घटनेची माहिती आहे. "आम्ही दोन सदस्यीय पथकाद्वारे चौकशीचे आदेश दिले आहेत. आम्हाला अहवाल मिळताच आम्ही कारवाई करू," असं ते म्हणाले आहेत. 


सर्जरीच्या वेळी डॉक्टर मद्यधुंद होते, या कुटुंबीयांच्या आरोपाबाबत विचारले असता वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं की, "जिल्ह्यात असा एकही डॉक्टर नाही. आणि या प्रकरणातील डॉक्टर अजिबात मद्यपान करत नाहीत".