Viral News: प्रेमविवाह म्हटलं की त्यात अनेकदा कुटुंबाचा अडथळा असतो. जात, धर्म, पैसा, नोकरी अशा वेगवेगळ्या कारणाने कुटुंबीय विरोध करत असतात. यावेळी अनेकदा प्रेमी युगूल कुटुंबीयांविरोधात बंड करत पळून जाण्याचा निर्णय घेतात. पण या निर्णयामुळे समाजात होणारी बदनामी कुटुबीयांसाठी जास्त भीतीदायक असते. यातूनच काही वेळा टोकाचे निर्णय घेतले जातात. राजस्थानमधील अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानच्या (Rajasthan) भीलवाडा (Bhilwada) जिल्ह्यात एक तरुणी आपल्याच जातीतील तरुणासोबत पळून गेली. कुटुंबाने याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली होती. यानंतर पोलिसांनी तरुणीचा शोध लावत तिला आणलं होतं. कुटुंबीयांच्या उपस्थितीत पोलिसांनी तरुणीशी संवाद साधला. यावेळी तरुणीने आपल्या कुटुंबीयांना ओळखण्यास नकार दिला. यानंतर ती आपल्या प्रियकरासह निघून गेली. 


मुलीच्या या निर्णयाने कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. त्यांना यामुळे इतक्या वेदना झाल्या की, त्यांनी आपल्या मुलीचा मृत्यू झाला आहे असंच जाहीर करुन टाकला. कुटुंब इतक्यावरच थांबलं नाही तर त्यांनी शोकसंदेश देणारे कार्डही छापून टाकले. या कार्डमध्ये शोकसंदेशात त्यांनी मुलीचा मृत्यू झाला असून तेराव्यात सहभागी होण्याचं आमंत्रणच दिलं. हे कार्डस सर्व ओळखीच्या लोकांकडे आणि नातेवाईकांकडे पाठवण्यात आले. 


कुटुंबाने छापलेले हे कार्ड्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर या कार्ड्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. यामध्ये मुलीचा फोटोही छापण्यात आला आहे. यामध्ये जिवंत मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगत तेराव्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. 


तरुणीने प्रियकरासह काढला पळ


रतनपुरा ग्राम येथे राहणारी प्रिया जाटन आपल्या कुटुंबीयांच्या मर्जीविरोधीत जात आपल्या प्रियकरासह पळ काढला. यानंतर कुटुंबीयांनी हमीरगड पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रियाचा शोध लावत तिला पोलीस ठाण्यात आणलं. पोलिसांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत तिच्याशी चर्चा केली असता, प्रियाने कुटुंबास ओळखण्यास नकार दिला आणि आपल्या प्रियकरासह निघून गेली. 


मुलीच्या निर्णयामुळे दुखावलेल्या कुटुंबाने यानंतर मुलगी आता आपल्यासाठी मेली असल्याचं जाहीर करुन टाकलं. यासाठी त्यांनी सरसकट कार्ड्स छापले आणि आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगत शोकसंदेश छापला. 1 जून 2023  रोजी प्रियाचा मृत्यू झाला असून 13 जून रोजी भोजनाला या असं संदेशात छापलं आहे. 


हे कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झालं असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकऱ्यांनी कुटुंबीय फारच टोकाचा निर्णय घेत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी कुटुंबाचा निर्णय योग्य असल्याचं सांगत समर्थन दिलं आहे.