टोमॅटोंची सुरक्षा करण्यासाठी शेतात झोपलेल्या शेतकऱ्याची गळा दाबून हत्या; सात दिवसातील दुसरी घटना, एकच खळबळ
Farmer Murder: आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) टोमॅटोचं (Tomato) रक्षण करण्यासाठी झोपलेल्या एका शेतकऱ्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या सात दिवसात शेतकऱ्याची हत्या झाल्याची दुसरी घटना आहे.
Farmer Murder: टोमॅटोचे दर वाढले असल्याने एकीकडे सर्वसामान्यांना जास्त पैसे खर्च करावे लागत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी लखपती झाले आहेत. पण यासह आपल्या पिकाचं संरक्षण करण्याची जबाबदारीही वाढली आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशात अशाच प्रकारे आपल्या पिकाचं संरक्षण करणाऱ्या एका शेतकऱ्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) टोमॅटोचं (Tomato) रक्षण करण्यासाठी शेतात झोपलेल्या एका शेतकऱ्याची अज्ञातांनी गळा दाबून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या सात दिवसात शेतकऱ्याची हत्या झाल्याची दुसरी घटना आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मधुकर रेड्डी असं या शेतकऱ्याचं नाव आहे. मधुकर रेड्डी रविवारी मध्यरात्री अन्नमय जिल्ह्यात पिकांचं रक्षण करण्यासाठी आपल्या शेतात झोपले असताना त्यांची गळा दाबून हत्या कऱण्यात आली. सकाळी मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. डीएसपी केसप्पा या प्रकरणाचा तपास करत आहेत.
"शेतकऱ्याची हत्या केल्याची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो होतो. याप्रकरणी तपास करत असून, अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत," अशी माहिती डीएसपी केसप्पा यांनी दिली आहे.
सात दिवसातील दुसरी घटना
टोमॅटो शेतकऱ्याची हत्या होण्याची ही सात दिवसातील दुसरी घटना आहे. याआधी एका 62 वर्षीय शेतकऱ्याची हत्या करण्यात आली होती. शेतकऱ्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात टोमॅटो विकून 32 लाख रुपये कमावले होते. यानंतर चोरांनी त्यांची हत्या केली.
राजशेखर रेड्डी असं या शेतकऱ्याचं नाव आहे. राजशेखर रेड्डी हे आपल्या शेतात टोमॅटो पिकवायचे आणि मार्केटमध्ये विकायचे. टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीचा राजशेखर रेड्डी यांना फायदा झाला होता. 70 कॅरेट टोमॅटो विकून त्यांनी 30 लाख रुपये कमावले होते.
राजशेखर रेड्डी मंगळवारी रात्री दूधाची डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना, काही अज्ञातांनी त्यांना अडवलं. त्यांचे हात, पाय बांधून आणि गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर काही वेळातच राजशेखर रेड्डी यांचा मृत्यू झाला. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. राजशेखर रेड्डी यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात लोक शेतात टोमॅटो खरेदीसाठी आल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं. दरम्यान त्यांना लुटण्यासाठीच हत्या झाल्याचा संशय आहे.
या हत्येत 3 ते 4 लोक सहभागी असण्याचा संशय आहे. राजशेखर यांना दोन मुली असून त्यांची लग्नं झाली आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत असून 4 पथकं तयार करण्यात आली आहेत. आंध्र प्रदेशात टोमॅटो 120 रुपये किलो आहे.