`एवढीही अक्कल नाही का?`, नैनीतालमध्ये कचरा फेकणाऱ्या तरुणीने जाब विचारल्यानंतर घातला वाद; नेटकरी म्हणाले `हेच बेजबादार..`
नैनीतालमध्ये रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणीला जेव्हा कचऱ्याच्या डब्याचा वापर करण्यास सांगण्यात आलं तेव्हा तिने चूक मान्य करण्याऐवजी उलट वाद घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारतीयांना डिसेंबर महिना आला की पर्यटनाचे वेध लागतात. मग ती शिमला मनालीमध्ये जाऊन थंडीचा आनंद घ्यायचा असो किंवा मग गोव्यात समुद्रकिनारी जाऊन लाटांची मनमुराद मजा लुटायची असो. पर्यटनामुळे संबंधित राज्यांचांही आर्थिक फायदा होता. मात्र याची काळी बाजू म्हणजे या दिवसांमध्ये प्रदूषणदेखील वाढतं. तसंच बेजबाबदार पर्यटकांमुळे घाणीचं साम्राज्य निर्माण होतं ती एक वेगळीच समस्या आहे. पर्यटक किती बेजबाबदार असतात याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 4.8 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले असून, स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा अधोऱेखित झाला आहे.
शिंजिनी सेनगुप्ता आणि उदिता बसू या बहिणींनी इंस्टाग्रामला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पर्यटक कचरा फेकण्यासाठी कचऱ्याच्या डब्याचा वापर करण्यास नकार देत असल्याचं दिसत आहे. "अनेक पर्यटक अशा प्रकारे पर्वतांना वागणूक देतात," अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे.
या घटनेची माहिती देताना सेनगुप्ताने लिहिलं आहे की, "हा नैनीतालमधील लव्हर्स पॉईंट आहे. 14 डिसेंबरला दुपारी 3 वाजता या लोकांनी वाढदिवसाचा केक कापला आणि टिश्यू पेपर्स रस्त्यावर फेकून दिले. यानंतर त्यांनी केकची बॅग फेकली".
कचरा डब्यात टाकण्यास सांगण्यात आलं असताना त्यांनी दुर्लक्ष केलं असं सेनगुप्ताने सांगितलं आहे. तिने लिहिलं की, "माझ्या बहिणीने हस्तक्षेप केला, त्यांना विनम्रपणे कचऱ्याच्या डब्यात कचरा टाकण्यास सांगण्यात आलं. लाल कपडे घातलेल्या महिलेने कचऱ्याचा डबा जवळपास नसल्याचं सांगितलं. नंतर दुकानदाराने तिच्याकडे तीच विनंती केली आणि कचरा फेकणाऱ्यांना पोलीस दंड ठोठावत असल्याचा उल्लेख केला".
अजून आग्रह केला असता कुटुंबाने बहिणींशा वाद घालण्यास सुरुवात केली. "त्या व्यक्तीने (त्यांच्या ड्रायव्हरने) नंतर प्लास्टिकची पिशवी उचलली आणि शेजारच्या दरीत फेकून दिली. आता केक बॉक्ससाठी माझ्या बहिणीने त्यांना पुन्हा सांगितलं. तेव्हा परिस्थिती आणखीन चिघळली. डस्टबिन अगदी 5 फुटांवर होता, तरीही त्यांनी वाद घातला. चला त्यांना शोधूया आणि ते याची पुनरावृत्ती करणात नाहीत याची खात्री करून घेऊया, चांगले नागरिक बनण्याचे ध्येय ठेवूया," असंही त्यांनी लिहिलं आहे.
या व्हिडीओत कुटुंबीय बहिणींशी उगाच लोकांशी भांडत असल्याचा आरोप करत होते. यावर त्या सांगतात की, "आम्ही भांडत नाही आहोत. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की, कृपया कचरा डब्यात टाका. तुम्ही येथे कचऱ्याचा डबा नाही असं सांगितलं". यानंतर तरुणी त्यांना तुम्ही तुमच्या कामाशा काम ठेवा असं सांगत भांडते.
ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. कमेंटमध्ये अनेकांनी आपलं मत मांडलं आहे. "माझ्यासोबत देहराडूनमध्ये असं अनेकवेळा घडतं. तुम्ही त्यांना कितीही कचरा टाकण्यापासून रोखलं तरी ते वाद घालतात. मी खूप वैतागलो आहे," असं एका इंस्टाग्राम युजरने लिहिलं आहे. . दुसऱ्याने म्टलं, "स्वत:ची चूक मान्य करणं इतके कठीण का आहे? लोकांचा अहंकार शिखरावर आहे."
एकाने टिप्पणी केली की, "कोणाचाही फोटो/व्हिडिओ त्यांच्या माहितीशिवाय ऑनलाइन पोस्ट करणं योग्य आहे असं मला वाटत असलं तरी, हे एका चांगल्या कारणासाठी आहे. पर्यावरण स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यांना रोखल्याबद्दल तुमचं अभिनंदन. आपल्याला सामाजिक भान नाही याची लाज वाटली पाहिजे".