एक्स-गर्लफ्रेंडला तरुणांसह स्कूटीवरुन फिरताना पाहून रोखलं, तरुणीने चाकूने भोसकून तरुणाला केलं ठार अन् नंतर...
Crime News: इंदूरच्या (Indore) विजय नगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात कॉलेजच्या काही तरुणांनी आपल्या सहकारी विद्यार्थ्याची चाकूने वार करत हत्या केली. बीटेकच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या (Murder) करणाऱ्यांमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. या तरुणीची ओळख पटली असून तानिया असं नाव आहे.
Crime News: मध्य प्रदेशच्या इंदूरमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. इंदूरच्या विजयनगर पोलीस ठाणे क्षेत्रात बुधवारी रात्री कॉलेजच्या काही तरुणांनी आपल्या सहकारी विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या केली. हत्या झालेला तरुण बीटेकचा विद्यार्थी होता. दरम्यान, हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. तिची ओळख पटली असून, तानिया असं नाव आहे. याशिवाय पोलिसांनी शोभित ठाकूर आणि छोटू उर्फ तन्मय ऋतिकला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण घटनाक्रम उलगडला असून, धक्कादायक माहिती समोर आली.
तानियाने मित्रांसह चाकूने केला हल्ला
इंदूरचे डीसीपी अभिषेक आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून 5 मित्र मोनू उर्फ प्रभास पवार, रचित आणि इतरजण चहा प्यायल्यानंतर महाकालला जाण्यासाठी निघाले होते. याचवेळी आरोपी तरुणी तानिया, शुभम, छोटू आणि ऋतिकसह अॅक्टिव्हावरुन जात होती. कारमधील तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडला पाहिल्यानंतर कार त्यांच्यासमोर उभी केली. यानंतर त्यांच्यात वाद सुरु झाला.
वाद इतका वाढला की, अॅक्टिव्हावर बसलेल्या तानियाने आपल्या मित्रांसह मिळून कारमधील रचितवर चाकूने हल्ला केला. पण रचित या हल्ल्यातून वाचला. यानंतर तानियाने मोनू उर्फ प्रभासवर दुसरा वार केला. हा चाकू प्रभासच्या ह्रदयाजवळ जाऊन लागला. चाकू लागल्याने प्रभास गंभीर जखमी झाला. यानंतर प्रभासला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तानियाला अटक करुन चौकशीला सुरुवात
हत्येची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर पोलिसांनी तात्काळ आऱोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळी असणारे सर्व सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींची गाडी दिसत होती. यानंतर पोलिसांनी गाडीच्या नंबरवरुन आरोपींची ओळख पटवली. पोलिसांनी तानियाला बेड्या ठोकल्या आणि तिची चौकशी सुरु केली.
प्राथमिक तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, तानियाची कारमध्ये असणाऱअया टिटूशी मैत्री होती. टिटूने जेव्हा तानिया अॅक्टिव्हावरुन शोभित आणि छोटूसह फिरताना पाहिलं तेव्हा कार थांबवली. यानंतर कारमधील रचित, टिटू आणि प्रभास यांनी तानियावर कमेंट करण्यास सुरुवात केली.
तानियाने सांगितला सगळा घटनाक्रम
यानंतर अॅक्टिव्हावरील शोभित, छोटू आणि तानिया यांनी कारमधील तरुणांना रोखलं. त्यांच्यात जोरदार वाद झाला. वाद वाढल्यानंत तानियाने चाकू काढून रचित आणि टिटू यांच्यावर हल्ला केला. पण दोघेही वाचल्यानंतर त्यांनी प्रभास उर्फ मोनूवर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान जीव गमावला.
पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपी तानियाला अटक केली आहे. तर शोभित ठाकूर आणि तन्मय ऋतिक यांना ताब्यात घेतलं आहे.