तरुणीच्या डोळ्यात घुसवला स्क्रूड्रायव्हर, नंतर ब्लेडने कापला गळा; मृतदेह पाहून पोलिसांचाही थरकाप
Telangana Girl Murder: तेलंगणमधील (Telangana) विकाराबाद येथे एका 19 वर्षाच्या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. अज्ञातांनी तरुणीवर हल्ला करताना सर्वात आधी तिच्या डोळ्यात स्क्रूड्रायव्हर घुसवला. नंतर ब्लेडने गळा कापून एका तळ्यात फेकून दिलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
Telangana Teen Murder Case: तेलंगणमध्ये (Telangana) एक धक्कादायक घटना घडली आहे. विकाराबाद येथे एका 19 वर्षाच्या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. अज्ञातांनी तरुणीवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी सर्वात आधी तिच्या डोळ्यात स्क्रूड्रायव्हर घुसवला. नंतर ब्लेडने गळा कापत तिला ठार केलं. एका तळ्यात तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरु केला आहे.
विकाराबाद जिल्ह्यातील परिगी मंडलच्या कालापूर गावात ही घटना घडली आहे. 19 वर्षाच्या तरुणीची अत्यंत भयानक पद्दतीने हत्या करण्यात आली आहे. तलावातून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. पीडित तरुणीचं नाव जुट्टू सिरिशा आहे. आरोपींनी सर्वात आधी तिच्या डोळ्यात स्क्रूड्रायव्हरने वार केला आणि नंतर ब्लेडने गळा कापून ठार केलं.
शनिवारी रात्री घरातून निघाली होती तरुणी
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी शनिवारी रात्री 11 वाजता घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती पुन्हा घरी परतलीच नाही. याचदरम्यान तिची हत्या करण्यात आली होती. दरम्यान या हत्येमागे नेमकं कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. ग्रामस्थांनी कल्लापूर गावाजवळ तलावात तरुणीचा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दिल्लीतही असाच प्रकार, 16 वर्षीय तरुणीची हत्या
नुकतंच दिल्लीच्या शाहबाद डेरी परिसरातही अशीच हत्या झाल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका 16 वर्षीय तरुणीची भररस्त्यात चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. साक्षीचा मित्र साहिल यानेच ही हत्या केल्याचं समोर आलं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांनी या घटनेबद्दल दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणी एकमेकांना ओळखत होते. पण कधीपासून ओळखत होते याचा तपास सुरु आहे. दोघांसंबंधी अधिक माहिती गोळा केली जात आहे. दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय झालं?
पोलिसांच्या माहितीनुसार, साहिल आणि पीडित तरुणी एकमेकांचे मित्र होते. पण कोणत्या तरी कारणावरुन दोघांमध्ये भांडण झालं होतं. यानंतर तरुणी एका वाढदिवसाच्या पार्टीला जात असताना आरोपी साहिलने तिला रस्त्यात रोखलं आणि अनेक वेळा चाकूने वार केला. नंतर त्याने दगड उचलून चार वेळा तिच्या डोक्यात घातला. हत्येनंतर आरोपी साहिल फरार झाला होता.