मध्य प्रदेशातील सतना पोलिसांनी चार वर्ष जुन्या हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा केल्याचा दावा केला आहे. कोटर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गोरइया गावात 19 जुलै 2019 रोजी एका गुहेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता. घटनास्थळी पोलिसांना एक हातमोजा सापडला होता. हा मृतदेह अॅसिड टाकून जाळण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला होता, पण त्यांना फारसं यश मिळत नव्हतं. पुरावे सापडत नसल्याने पोलीस हतबल झाले होते. मात्र आता पोलिसांनी या हत्येचा उलगडा केल्याचा दावा केला आहे. ही हत्या इतर कोणी नव्हे तर मृत तरुणाच्या भावानेच केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे आपल्याच वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. समजावल्यानंतरही तो ऐकत नव्हता. अखेर संतापाच्या भरात भावाने कु-हाडीने वार करुन छोट्या भावाची हत्या केली. यानंतर मृत तरुणाचा भाऊ आणि वहिनीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. 


नेमकं काय झालं होतं?


23 जुलै 2019 रोजी मंदिराच्या जवळ असणाऱ्या गुहेत एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह अॅसिड टाकून जाळण्यात आला होता. हा मृतदेह मोहम्मद जिलानी याचा असल्याची ओळख पटली होती. तो 19 जुलैपासून बेपत्ता होता. चार दिवसांनी घऱापासून फक्त 200 मीटर अंतरावर हा मृतदेह सापडला होता. 


पोलिसांना घटनास्थळी एक हातमोजा सापडला होता.  हा हातमोजाही अर्धवट जळालेला होता. पोलीस तपासात धारदार शस्त्राने हत्या केल्याची आणि अॅसिडने जाळल्याचे पुरावे सापडले होते. पण पोलिसांना आरोपींची ओळख पटवणारा कोणताही पुरावा सापडला नव्हता. काही दिवसांच्या तपासानंतर हे प्रकरण बंद करण्यात आलं होतं. पण अखेर साडे तीन वर्षांनी पोलिसांनी पुन्हा एकदा या प्रकरणाचा तपास सुरु केला. महिन्याभराच्या तपासानंतर पोलिसांनी उलगडा केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. 


भावानेच केली भावाची हत्या


हत्या इतर कोणी नव्हे तर भावानेच केली होती. गावातील अनेक लोकांवर संशय व्यक्त करत त्यांनी पोलीस तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला होता. पण अखेर आरोपी सापडले असून हत्या मोठा भाऊ, त्याची पत्नी आणि भावोजीने मिळून केली होती. 


पोलीस अधीक्षक आशुतोष गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण जिलानीचे मोठा भाऊ नशीमची पत्नी आयशासोबत अनैतिक संबंध होते. मोठ्या भावाला याची माहिती मिळाल्यानंतर त्याने त्याला समजावलं होतं. पण तरीही त्याने वहिनीला भेटणं बंद केलं नव्हतं. 


आक्षेपार्ह स्थितीत सापडला भाऊ आणि बायको


आशुतोष गुप्ता यांनी सांगितलं की, 19 जुलैच्या दुपारी मृत तरुण आणि वहिनी आक्षेपार्ह स्थितीत सापडले होते. यामुळे मोठा भाऊ नशीन संतापला आणि त्याने जिलानीची कु-हाडीने वार करुन हत्या केली. हत्येनंतर आरोपी नशीमची पत्नी आयशा आणि भावोजी हलीमसोबत मिळून त्याने मृतदेह लपवून ठेवला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह अॅसिड टाकून जाळला. पण मृतदेहाजवळ सापडलेल्या हातमोजाने सर्व गोष्टी उघड केल्या.