बांगड्या, टिकली, लिपस्टिक...; प्रेयसीचे कपडे घालून तरुण परीक्षा केंद्रावर पोहोचला, पण त्या एका चुकीमुळे अडकला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंग्रेज सिंग याने आपण परमजीत कौर आहेत हे सिद्ध करण्यासाठी बनावट मतदानपत्र आणि आधार कार्डही तयार करुन घेतलं होतं.
तुझ्यासाठी मी चंद्र, तारे तोडून आणेन असं म्हणणारे प्रियकर तुम्ही चित्रपटात किंवा खऱ्या आयुष्यातही पाहिले असतील. प्रेमात व्यक्ती कोणत्याही थऱाला जाण्यास तयार असते. पण हे करताना आपण काही चुकीचं करत आहोत की नाही याचंही अनेकदा भान राहत नाही. पण हा विचार न करणं तुम्हाला संकटात टाकू शकतं. पंजाबमध्ये अशीच एक घटना घडली असून, प्रेयसीच्या जागी परीक्षा देण्यासाठी पोहोचलेल्या प्रियकराला पकडण्यात आलं. प्रेयसीसाठी केलेलं नसतं धाडस त्याला महागात पडलं असून आता कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागत आहे. पंजाबच्या फरीदकोट येथे हा प्रकार घडला आहे.
7 जानेवारी रोजी कोटकपुरा येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली. फाजिल्का येथील अंग्रेज सिंगने त्याची मैत्रीण परमजीत कौरचा वेश धारण करून परीक्षा देण्याचं ठरवलं. यासाठी त्याने लाल बांगड्या, टिकली, लिपस्टिक आणि लेडीज सूट घातला होता.
पण अंग्रेज सिंगला हे धाडस महागात पडलं. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर काही वेळातच त्याचं खरं रुप समोर आलं आणि याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंग्रेज सिंग याने आपल्या प्रेयसीच्या जागी परीक्षा देण्यासाठी चोख तयारी केली होती. त्याने बनावट आधार कार्ड आणि मतदारपत्र तयार केलं होतं. पण परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिकच्या माध्यमातून उमेदवारांचे फिंगरप्रिंट घेण्यात आले असता त्याचा खरा चेहरा उघड झाला आणि सर्व योजना फसली.
दुसरीकडे विद्यापीठ व्यवस्थापनाने खरी उमेदवार परमजीत कौरचा अर्ज बाद केला आहे. दुसरीकडे व्यवस्थापनाने अंग्रेज सिंगविरोधात कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.