आईच्या उपचारासाठी जमा करण्यात आलेले पैसे 26 वर्षीय तरुणाने चक्क ऑनलाइन रमी गेम खेळण्यासाठी वापरले. इतकंच नाही तर यावरुन आई आणि भावाने जाब विचारत ओरडल्यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. शुक्रवारी तरुण बेपत्ता झाला होता. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृत्तानुसार, चेन्नईच्या चिन्नमलाई येथील सेकंड स्ट्रीटवर राहणारा हा तरुण अन्न व्यवसायात अधूनमधून काम करत होता. या तरुणाच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले आणि तो त्याच्या आई आणि भावासोबत राहत होता, असंही समजत आहे. 


कोविड काळात त्याने ऑनलाइन गेम खेळण्यास सुरुवात केली. यानंतर त्याला गेमचं व्यसनच लागलं. त्याने आईने कॅन्सरच्या उपचारासाठी जमा केलेले 30 हजार रुपये चोरले. या पैशांतून त्याने ऑनलाइन रमी गेम खेळला. आईला आणि भावाला हे समजताच त्यांनी त्याला टोकलं आणि ओरडले. बेजबाबदार वागत असल्याने त्यांनी त्याला चांगलंच सुनावलं.


आई आणि भाऊ ओरडल्यानंर तरुण बेपत्ता झाला होता. यानंतर त्यांनी त्याचा शोध सुरु केला होता. त्याचा मोबाईल फोन स्विच ऑफ असल्याने त्याच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क होत नव्हता. त्याचे मित्र आणि नातेवाईकांच्या घरीही त्यांनी शोध घेतला. शनिवारी पहाटे 3.30 वाजता कुटुंबातील सदस्यांना घराच्या गच्चीवर तपासलं. यावेळी त्याने आत्महत्या केल्याचं आढळलं. 


तरुणाने टीव्ही केबल वायरच्या सहाय्याने गच्चीवर असणाऱ्या एका खोली गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. दरम्यान आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.