उत्तर प्रदेशात पत्नीने पतीवर अमानवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीचे हात पाय बांधून पत्नीने त्याच्या शरिरावर सिगारेटचे चटके देत निर्दयीपणे छळ केला. बिजनोर येथे ही घटना घडली असून, पोलिसांनी याप्रकरणी पत्नीला अटक केली आहे. मेहेर जहाँ असं आरोपी पत्नीचं नाव आहे. पतीने केलेल्या तक्रारीच्या आधारे 5 मे रोजी पोलिसांनी पत्नीला अटक केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनन झैदी असं पीडित पतीचं नाव आहे. त्याने आरोप केला आहे की, पत्नीने आपल्या गुंगीचं औषध देत बेशुद्ध केलं. यानंतर हात पाय बांधले आणि नंतर संपूर्ण शरिरावर सिगारेटचे चटके दिले. पतीने पोलिसांकडे घरातील सीसीटीव्ही फुटेजही सोपवलं आहे. यामध्ये पत्नी मनन झैदीवर शारिरीक अत्याचार करत असल्याचं दिसत आहे. मननचे हात पाय बांधल्यानंतर त्याच्या छातीवर बसून ती गळा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सीसीटीव्हीत कैद झालं आहे. 


यानंतर व्हिडीओत आरोपी पत्नी पतीच्या सर्व शरिरावर सिगारेटचे चटके देत असल्याचं दिसत आहे. मनन झैदीने दावा केला आहे की, आपण याआधीही यासंबंधी पोलिसांत तक्रार केली होती. पत्नीवर मादक पदार्थांचे सेवन करून, त्याचे हात पाय बांधून अत्याचार केल्याचा आरोप त्याने केला होता. 


मनन झैदीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मेहर जहाँविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हत्येचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला आणि छळ यासह गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे.


"तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध संबंधित कलमांखाली तक्रार नोंदवून तिला अटक केली आहे. पुढील कारवाई केली जात आहे," अशी माहिती पोलिस अधीक्षक धरमपाल सिंह यांनी दिली आहे.