सोशल मीडियाच्या सध्याच्या जमानात रीलची क्रेझ असल्याने अनेक कंटेट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर सार्वजनिक ठिकाणी डान्स, स्टंट किंवा अभिनय करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर हे रील शेअर करुन प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण व्हायरल होण्याच्या त्यांचा या मूर्खपणाची किंमत अनेकदा इतरांना मोजावी लागते. आपण एका रीलसाठी एखाद्या अनोळख्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण करत आहोत इतकीही अक्कल त्यांना नसते. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. दिल्लीच्या सिग्नेचर ब्रीजवरील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. 


व्हिडीओत काय आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओच्या सुरुवातीला एक तरुण धावत्या रिक्षात धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. रिक्षाच्या दरवाजावर उभा असलेला हा तरुण हुल्लडबाजी करत आजुबाजूने जाणाऱ्या वाहनांनाही हात लावत आपण किती शूर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. दरम्यान, यावेळी ब्रीजवर वाहनांची आणि लोकांचीही गर्दी दिसत आहे. वर्दळीच्या या रस्त्यावर त्याची स्टंटबाजी सुरु असताना तो मागून येणाऱ्या वाहनांकडे पाहून कौशल्याच्या नावे सुरु असलेला मूर्खपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याला पुढे जाणारा सायकलस्वार दिसत नाही. तरुणाचा धक्का लागल्याने सायकलस्वार खाली कोसळतो. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


या रिक्षाच्या मागे धावणाऱ्या एका दुचाकीस्वाराने हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचं दिसत आहे. सायकलस्वाराला आपल्या मागे सुरु असणारी हुल्लडबाजी माहिती नसल्याने त्यालाही नेमकं काय हे समजत नाही. तर दुसरीकडे रस्त्यावर उभ्या महिलाही आश्चर्याने पाहू लागतात. पण त्यानंतरही रिक्षा मात्र थांबत नाही. तसंच तरुणही स्टंटबाजी कायम करत राहतो. 


सायकलस्वार पडल्यानंतर मागून वेगाने धावणारी दुचाकी सुदैवाने थांबते. अन्यथा सायकलस्वार या दुचाकीच्या खाली येण्याची शक्यता होती. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत संताप व्यक्त करत आहेत. 


दिल्ली पोलिसांनीही या व्हिडीओची दखल घेतली असून, यामध्ये सहभागी रिक्षाच्या आधारे चालकाची माहिती मिळवली आहे. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी परवाना नसतानाही बेदरकारपणे धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय इतर कलमांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच रिक्षा जप्त करण्यात आली आहे.