Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) पाली जिल्ह्यात अंगावर शहारा आणेल अशी एक धक्कादायक घटना घडली आहे. माणूस गुन्हा करताना कोणत्या सीमा गाठू शकतो हे यावरुन दिसत आहे. या घटनेनंतर फक्त ग्रामस्थच नाही तर पोलिसांना धक्का बसला असून हादरले आहेत. झालं असं की, सराधना परिसरात एका तरुणाने वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या (Murder) केली. महिला जंगलात बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन गेली असता आरोपीने तिच्यावर हल्ला केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने हत्या केल्यानंतर महिलेच्या चेहऱ्याचं मांस ओरबाडून खाल्लं. ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, अधिक तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, सराधना गावात राहणारी वृद्ध महिला नेहमीप्रमाणे बकऱ्यांना चरण्यासाठी जंगलात घेऊन गेली होती. यावेळी तरुणाने तिच्यावर हल्ला केला. तरुणाने वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केलं. या हल्ल्यानंतर महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने तिथेच बसून महिलेच्या चेहऱ्याचं मांस खाण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने आपला शर्ट काढला आणि महिलेचा चेहरा झाकला. 


जंगलात बकऱ्या चरण्यासाठी नेलेल्या इतर ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिला असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. इतकी निर्घृण हत्या आणि किळसवाणा प्रकार पाहून त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांना फोन करण्यात आल्याचं कळताच आरोपीने पळ काढला. यानंतर ग्रामस्थांनी जवळपास 1 किमीपर्यंत त्याचा पाठलाग करत पकडलं. यानंतर त्यांनी पुन्हा पोलिसांना फोन करुन आरोपीला पकडलं असल्याची माहिती दिली. 


घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस आरोपीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले. आरोपीने महिलेच्या चेहऱ्यावरचं मांस खाल्याच्या वृत्ताला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. त्याचा चेहरा रक्ताने माखलेला होता. तसंच त्याच्या दातांमध्ये मांसाचे तुकडे सापडले आहेत. 


पोलिसांनी तपास केला असता आरोपीची ओळख पटली आहे. 24 वर्षीय सुरेंद्र हा मुंबईमधून आला होता. तो व्यसनाच्या आहारी गेला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून चौकशी करत आहेत. हत्येमागे अजून काही कारण होतं का? याची माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान, महिलेचा मृतदेह सेंदडा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून अनेकांना हे अमानवीय कृत्य पाहून धक्का बसला आहे.