Crime News In Marathi: सनी देओलचा (Sunny Deol) गदर-२ (Gadar-2) सिनेमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. देशात अनेक राज्यात हाऊसफुल्लचे शो लागले आहेत. छत्तीसगढ राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गदर-२ चित्रपट पाहून आलेल्या युवकाला हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देणे महागात पडले आहे. हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या तरुणाची टोळक्याकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. मलकित सिंह असं या तरुणाचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयटीआय मैदानात शनिवारी संध्याकाळी २ मुलं मोबाइलवर अभिनेता देओलचा गदर-२ हा चित्रपट ऑनलाइन पाहत होते. त्याचवेळी मलकित सिंह उर्फ वीरुने चित्रपट पाहत असतानाच हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्याचवेळी त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या तरुणाच्या एका टोळक्याला वीरुचा राग आला. तिथे असलेल्या चार ते पाच जणांनी विरुला बेदम मारहाण केली. तर, विरुच्या मित्राला चाकुचा धाक दाखवून गुडघ्यांवर बसवून ठेवलं होतं. मित्रासमोरच विरुला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले. 


गंभीर जखमी झालेल्या मलकीतला रात्री रायपूर येथील रामकृष्ण केयर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. मलकितसोबत घडलेल्या प्रकारामुळं परिसरात संतप्त वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथक तैनात केली होती. शनिवारी दुपारी 1 वाजता आरोपींना ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अधिक चौकशी करण्यात येत आहे. 


दरम्यान, तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी नुकसानभरपाई आणि मदतीची मागणी केली आहे. त्यासाठी पोलिस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मद्यपान केले होते. त्याचवेळी मलकित आणि त्यांच्यात घोषणा देण्याच्या कारणावरुन वाद झाले आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. 


मलकित सिंह यांच्या हत्येनंतर छत्तीसगड शिख पंचायतयेथील शिथ समाजातील लोकांनी २४ तास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मलकितच्या कुटुंबीयांना 50 लाखांची नुकसानभरपाई देण्यात यावी नाहीतर आम्ही गावाची सीमा बंद करु, असा इशारा त्यांनी दिला आहे.