बंगळुरुत 23 वर्षीय तरुणाला बस कंडक्टरवर चाकूहल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कंडक्टरने बसमध्ये दरवाजापासून दूर उभं राहायला सांगितल्याने त्याचा संताप झाला आणि याच रागातून त्याने कंडक्टवर हल्ला केला. 45 वर्षीय बस कंडक्टर योगेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सध्याची त्याची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही संपूर्ण घटना बसमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या व्हिडीओत हर्ष सिन्हा योगेशवर हल्ला करत असल्याचं आणि नंतर इतर प्रवाशांना धमकावत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओची वैधता पडताळण्यात आलेली नाही. 


पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मूळचा झारखंडचा असलेला हर्ष सिन्हा बीपीओ कंपनीत कामाला होता. त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं. तीन आठवड्यांपासून तो बेरोजगार होता. नोकरी गेल्याने तो हताश होता अशी माहिती त्याने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 



मंगळवारी संध्याकाळी आयटीपीएल बस स्टॉपजवळ ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. बसमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याने योगेशने हर्षला दरवाजापासून दूर उभं राहण्यास सांगितलं. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर हर्ष सिन्हा याने बॅगेतून चाकू काढला आणि बस कंडक्टरवर वार केले.


चाकूहल्ला झाल्यानंतर बसमधील प्रवासी घाबरले आणि एकच धावपळ सुरु झाली. व्हायरल झालेल्या व्हिडीओत हर्ष सिन्हा इतर प्रवाशांना चाकू दाखवत धमकावत असल्याचं दिसत आहे. बस चालक सिद्धलिंगस्वामी याने प्रसंगावधान दाखवत दरवाजे लॉक करुन बाहेर उडी मारली. यामुळे हर्ष आतमध्येच अडकला होता. यानंतर त्याने काचेच्या दरवाजांवर लाथा मारुन तो तोडण्याचा प्रयत्न केला. 


आरोपी बसमध्ये अडकल्यानंतर चालक आणि प्रवाशांनी पोलिसांना फोन करुन बोलावलं. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली. "बस कंडक्टरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला दोन ते तीन ठिकाणी जखमा झाल्या आहेत. पण आता तो धोक्याबाहेर आहे. आरोपी प्रवाशाला खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे," असं पीटीआयने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले.