भारतीय वायुदलाच्या हॅलिकॉप्टरला अपघात
हवेतच घेतला पेट- सूत्र
श्रीनगर : भारतीय वायुसेनेच्या हॅलिकॉप्टरला जम्मू- काश्मीरच्या बडगाम येथे अपघात झाल्याचं वृत्त समेर येत आहे. या दुर्घटनेत वायुदलाचे दोन अधिकारी म्हणजेच वैमानिक आणि सह वैमानिक शहीद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, पण त्याविषयीची अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. हॅलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्रथमिक माहिती मिळत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बडगामजवळ एका खुल्या मैदानात हे विमान कोसळलं. सकाळी १० वाजून पाच मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण स्वरुपाता होता की , हॅलिक़ॉप्टरन लगेचच पेट घेतला. दरम्यान, या घटनेत दोघांचे मृतदेह हाती लागले असून त्यांच्या ओळखीविषयीची अधिकृत माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही.
२६ फेब्रुवारीला भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात केलेल्या 'एअर स्ट्राईक'च्या दुसऱ्याच दिवशी, बुधवारी भारतात वायुदलाच्या विमानाचा हा अपघात झाला आहे. मुळात अतिशय तणावाची परिस्थिती असणाऱ्या जम्मू- काश्मीर भागातच हा अपघात झाल्यामुळे घटनास्थळी गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. काही प्रत्यक्षदर्शी आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हॅलिकॉप्टरने हवेतच पेट घेतला. वायुदलाच्या एमआय- १७ Mi-17 या हॅलिकॉप्टरला हा अपघात झाला असून घटनास्थळी सैन्यदल अधिकारी दाखल झाल्याचं कळत आहे. अपघातामागचं मूळ कारण अद्यापही अस्पष्ट असून, याविषयीची माहिती काही वेळातच स्पष्ट होणार असल्याचं कळत आहे.